Sun, Oct 20, 2019 11:41होमपेज › Goa › बोडगेश्‍वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी 

बोडगेश्‍वराच्या दर्शनासाठी अलोट गर्दी 

Published On: Jan 02 2018 12:59AM | Last Updated: Jan 02 2018 1:54AM

बुकमार्क करा
म्हापसा ः प्रतिनिधी 

श्री देव बोडगेश्‍वराच्या 83 व्या जत्रोत्सवास सोमवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हजारो भाविकांनी बोडगेश्‍वराच्या दर्शनासाठी यंदा श्रींच्या मूर्ती स्थापनेचा 25 वा वर्धापनदिन असल्याने कार्यकारी मंडळाने 25 सत्यनारायण महापूजेसाठी 25 दांपत्यांना ही संधी दिली. मंदिर प्रांगणात एक खास मंडप उभारून या संयुक्त सत्यनारायण पूजेचा सोहळा झाला. म्हापशातील प्रसिध्द पुरोहीत राजू केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ब्राह्मणांनी या सामूहिक पूजेस सहकार्य केले. संपूर्ण परिसरात ब्रम्ह वृंदातर्फे अनेक धार्मिक कार्यक्रम झाले. 

मंदिरासमोरच श्री देव बोडगेश्‍वराच्या चांदीच्या पादत्राणांची स्थापना करण्यात आली आहे. प्रभारी अध्यक्ष आनंद भाईडकर व अल्पा भाईडकर यांनी स्थापनेचे यजमानपद भूषविले. श्री देव बोडगेश्‍वर मूर्तीच्या उजव्या बाजूस असलेल्या प्रांगणात तुळशी वृंदावन उभारण्यात आले असून तुळशी वृंदावन उत्कृष्ट प्रतिचे ठरले आहे. या वृंदावनाचेे उद्यापनही श्यामसुंदर पेडणेकर यांच्याहस्ते सपत्नीक करण्यात आले. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस असलेल्या वृक्षाच्या पेडांवर यंदा नवीन घुमट्यांची उभारणी करण्यात आली असून या सुंदर घुमट्यांचे शुध्दीकरण व उद्यापनही वर्धापनदिनाच्या सोहळ्यात झाले. सर्वप्रथम श्रीदेव बोडगेश्‍वराच्या चरणी मंदिर समितीतर्फे पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी 1 वाजता सामुहिक आरत्या केल्यानंतर महाप्रसाद वाटप झाले. हजारो लोकांनी रांगेत उभे राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. 

जत्रोत्सवादिवशी (दि.1) श्रींच्या उत्सव मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. दुपारी 12 वा. म्हापसा शहरातील धुळेर फेअर बायश, गावसवाडा, खोर्लीतोळ घाटेश्‍वर, मरड येथील राष्ट्रोळी देवतांचा मान श्री बोडगेश्‍वर चरणी वाजत गाजत येत असतो. म्हापसा पोलिस स्थानक, बार्देश बाजार, म्हापसा बाजार, अन्साभाट, व 30 गणेश मंडळांकडून श्रींस वार्षिक मान देण्यात येतो. दुपारच्यावेळी अलोट गर्दीत भाविकांनी उन्हाची पर्वा न करता रांगेत उभे राहून श्री देव बोडगेश्‍वराचे दर्शन घेतले. यानंतर रात्रभर भाविकांच्या रांगा देवदर्शनासाठी लागल्या होत्या. श्यामगावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी गार्‍हाणे घातले. प्रभारी अध्यक्ष आनंद कांदोळकर व त्यांचे सहकारी आणि स्वयंसेवकांनी भाविकांना सहकार्य केले. जत्रोत्सवानिमित्त सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.