Wed, Mar 20, 2019 12:47होमपेज › Goa › येडियुरप्पांना पाठवलेले पत्र मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावे  

येडियुरप्पांना पाठवलेले पत्र मुख्यमंत्र्यांनी मागे घ्यावे  

Published On: Jan 16 2018 2:29AM | Last Updated: Jan 16 2018 2:09AM

बुकमार्क करा
म्हापसा : प्रतिनिधी

म्हादई नदीचे पाणी पिण्यासाठी उत्तर कर्नाटकाला देण्यासंदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना पाठवलेले पत्र मागे घेऊन गोव्यात  निर्माण झालेले संघर्षमय वातावरण  शमवावे,असा   ठराव म्हापसा येथील  प्रीतीभोजन कक्षात  सोमवारी झालेेल्या ‘आम्ही गोंयकार’ संघटनेच्या सर्वपक्षीय सदस्यांच्या सभेत  घेण्यात आला.  अ‍ॅड. अजितसिंह राणे यांनी हा ठराव मांडला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तो संमत केला.  व्यासपीठावर जनार्दन ताम्हणकर, संजय बर्डे,मधुकर गांवकर, राजन घाटे, अनिल लाड, बलभीम मालवणकर, विजय भिके  आदी  उपस्थित होते.

  आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की उपसभापती मायकल लोबो यांनी  म्हादई प्रश्‍नी धर्माचे राजकारण चालवले आहे. पाण्याचा  आणि धर्माचा काहीही संबंध नाही हेे त्यांनी लक्षात घ्यावे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करणे गैर आहे. पिण्याचे  पाणी इतर कामासाठी वापरण्याला आमचा तीव्र विरोध आहे.     येत्या अधिवेशनात सरकारला आपण नक्कीच धारेवर धरू, असेही त्यांनी सांगितले.
अ‍ॅड.अजितसिंह राणे  म्हणाले की, आम्ही मुर्खांच्या नंदनवनात वावरत असल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधान योग्य वाटते का, कारण 12 आमदार  हाती असताना त्यांनी 21 मध्ये परावर्तित  केले,तरी आम्ही गप्प. माडाचे गवत आणि गवताचा माड झाला तरी आम्ही गप्प.

खाण घोटाळ्यात  कुणीही गजाआड गेले नाहीत तरी आम्ही गप्प. पण आता म्हादईच्या रूपाने आमच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे,आता गप्प राहणार नाही. लवादाचा निर्णय आमच्या बाजूने लागण्याची चिन्हे असताना  घाईघाईत मुख्यमंत्र्यांनी येडियुरप्पा यांना पाठवलेले पत्र निषेधार्ह असून ते त्वरित मागे घेऊन गोमंतकीयांना दिलासा द्यावा. मधुकर गावकर म्हणाले, आमच्या चाळीसही आमदारांनी  म्हादई अभयारण्याला भेट देऊन पाहणी करावी. म्हादईचे पाणी  पळवण्याचा कर्नाटकी घाट हा  केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नसून शेती व उद्योगाला वापरण्यासाठीचा आहे.  प्राण गेला तरी आपण हे होऊ देणार नाही.

गोव्यालाच पाणी टंचाईला सामोरे जावे  लागते याचा विचार करायचे सोडून दुसर्‍यांना पाणी कसे देता,असा प्रश्‍न  शाम गोवेकर यांनी उपस्थित केला.  गोमंतकीयांच्या हक्काचे पाणी राज्यातील जनतेला मिळायला हवे,असे मत जनार्दन  ताम्हणकर यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके म्हणाले, म्हापशाचे आमदार म्हापसेकरांना पाणी मिळत नाही,  म्हणून टाहो फोडतात. त्या म्हापसेकरांबद्दल सरकारला काहीच वाटत नाही.   दीपेश नाईक, बलभीम मालवणकर, संजय बर्डे, श्रीमती ज्युडीथ फेनार्ंडिस, सूरज नाईक, नारायण राटवड, कपील कोरगांवकर, अनिल लाड यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती केरकर यांनी केले. सर्वपक्षांचे व संघटनांचे प्रतिनिधी या सभेत उपस्थित होते.