Fri, Apr 26, 2019 01:50होमपेज › Goa › ‘म्हापसा अर्बन’ डबघाईस जबाबदार असणार्‍या संचालकांवर कारवाई करा

‘म्हापसा अर्बन’ डबघाईस जबाबदार असणार्‍या संचालकांवर कारवाई करा

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMम्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा अर्बन बँक आर्थिक डबघाईला  येण्याला  संचालक मंडळच   जबाबदार असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवून सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करावी. संबंधित संचालकांची संपत्ती जप्त करून त्यांची बँक खाती गोठवावी, अशी मागणी म्हापसा अर्बन बँकेच्या  भागधारकांनी संचालक मंडळाने राजीनामे दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर  नंदादीप सभागृहात शनिवारी आयोजित बैठकीत केली.

बहुराज्य बँकेचा दर्जा हटवून ती राज्य बँक करावी व बँकेला डबघाईला आणणार्‍या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशा विविध मागण्या म्हापसा अर्बनचे भागधारक, खातेदार व कर्मचार्‍यांच्या बैठकीत करण्यात आल्या. या बैठकीत नगरसेवक राजसिंह राणे, किरण शिरोडकर, परेश रायकर, यशवंत गवंडळकर, रेशम भर्तु व अभय गवंडळकर, संदेश नाईक तसेच बँकेचे सरव्यवस्थापक शैलेंद्र सावंत उपस्थित होते. बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या निर्बंधांमुळे खातेदार, कर्मचारी अडचणीत आले आहेत. सध्या चतुर्थीच्या सणासाठी खात्यावर पैसे असूनही काढता येत नाहीत, अशी स्थिती झाली आहे. याचा गांभिर्याने विचार करून खातेदाराने रिझव्हर्र् बँक व सरकारला निर्बंध शिथिल करण्यास भाग पाडावे, अशी मागणीही करण्यात आली. 

बँकेचे कर्मचारी व भागधारक यांना वार्‍यावर सोडून संचालक मंडळाने पलायन केले, मात्र त्यांची जबाबदारी संपत नसून बँकेच्या नुकसानीस जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे मतही काही जणांनी व्यक्त केले. नियमानुसार सहकारी संस्थांच्या सभा सप्टेंबर अखेरीस होणे क्रमप्राप्त असल्याने म्हापसा अर्बन बँकेची सर्वसाधारण सभा दि. 29 सप्टेंबर रोजी नंदादीप सभागृहात सायंकाळी 4.00 वा. होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. 

या बैठकीत राजसिंह राणे यांनी स्वागत केले. किरण शिरोडकर, परेश रायकर, यशवंत गवंडळकर, रेशम भर्तु, अभय गवंडळकर, संदेश नाईक, शशिकांत कांदोळकर, अनिल नाईक, प्रदीप शिरोडकर, विनयकुमार मंत्रवादी, अर्जुन आसोलकर, नगराध्यक्ष रायन ब्रागंझा, एकनाथ म्हापसेकर, अनंत गाड, श्यामसुंदर कवठणकर, परेश शिरसाट, संजय वालावलकर यांनी बैठकीत सूचना मांडल्या. रेशम भर्तू यांनी आभार मानले.

‘चतुर्थीकाळात निर्बंध शिथिल करा’ म्हापसा अर्बन सहकारी बँक टिकावी यासाठी रिझर्व्ह बँकेने लादलेले निर्बंध शिथिल करून राज्य सरकारच्या मदतीने चतुर्थीच्या काळात ग्राहकांना पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही भागधारकांकडून करण्यात आली.