Tue, Jul 16, 2019 22:14होमपेज › Goa › कळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी

कळंगुटमध्ये पर्यटकांच्या मारहाणीत चौघे जखमी

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:10AM

बुकमार्क करा
म्हापसा ः प्रतिनिधी

कळंगुट तिवायवाडा येथे पर्यटकांचे आपसातील भांडण सोडवण्यासाठी गेलेले चार स्थानिक पर्यटकांच्या मारहाणीत जखमी झाले. यातील दोघे गंभीर जखमी असून त्यांना गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून मारहाण केल्याप्रकरणी 15 संशयित पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे. राजू भेडीकर (कळंगुट), रेमी रिबेलो (केपे), जयेश भंडारी (सांगे), अभिलाष पाटील अशी पर्यटकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे असून राजू भेडीकर व जयेश भंडारी गंभीर जखमी आहेत. अन्य दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयितांची मिनीबस पोलिसांनी जप्त केली आहे.

हा प्रकार सोमवार दि.1 रोजी रात्री घडला. फिर्यादी रेमी रिबेलो (रूम बॉय) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भा.दं.सं.च्या 143, 147, 148, 323 व 307 कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्यांमध्ये के. दर्शन, ए. श्रीनिवास, प्रशांत रेड्डी, सय्यद उस्मान, सय्यद बदरूद्दीन, पुरुषोत्तम रेड्डी, नरसिंहा रेड्डी, एस. अजय, डी. श्रीनिवास, सी. कृष्णा, एम. किरण, बी. अंजनीयेलू, के. भोपाल, देवानंद अंजया व अंजनाह बलीह यांचा समावेश आहे. संशयित  तेलंगणमधून आलेले पर्यटक आहेत. गेस्ट हाऊसच्या बाहेर त्यांच्यात आपापसात भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेस्ट हाऊसचे व्यवस्थापक अभिलाष पाटील गेले असता त्यांना संशयितांनी मारहाण केल्याने ते पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये गेले.पर्यटकांमधील वाद पाहून शेजारील हॉटेलचा रूमबॉय फिर्यादी रेमी रिबेलो भांडण सोडवायला गेला. त्यालाही संशयितांनी 

मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर त्याने आपल्या राजू भेडीकर (कळंगुट) व जयेश भंडारी (सांगे) या दोघा मित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. दोघेही मदतीसाठी आले असता संशयितांनी या तिघांनाही मारहाण केली. या मारहाणीत राजू आणि जयेश जबर जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.