Sun, Oct 20, 2019 01:44होमपेज › Goa › बोडगेश्‍वर जत्रोत्सवात 225 किलो कापडी पिशव्यांचे वितरण

बोडगेश्‍वर जत्रोत्सवात 225 किलो कापडी पिशव्यांचे वितरण

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 02 2018 11:43PM

बुकमार्क करा
म्हापसा ः प्रतिनिधी

यंदाचा 83 वा देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा म्हापसा पालिका व देवस्थान संस्थान समितीतर्फे करण्यात आली होती. त्यास 100 टक्के यश आले आहे. दिवसभरात 225 किलो कापडी पिशव्या भाविकांना वितरीत करण्यात आल्या, अशी माहिती नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी दिली. कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष संजीत रॉड्रिग्स यांच्या मार्गदर्शनाखाली म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष रोहन कवळेकर व देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर तसेच समितीच्या पुढाकाराने यंदा देव बोडगेश्‍वराचा जत्रोत्सव कचरामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एका किलोमध्ये सुमारे 130 पिशव्या या प्रमाणे 225 किलोच्या 29 हजार 250 पिशव्या वितरीत करण्यात आल्याचे कवळेकर यांनी सांगितले.  पहिल्याच दिवशी प्लास्टिकमुक्त बोडगेश्‍वर जत्रोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. याबाबत सर्वत्र जनजागृती करण्यात आली होती. शिवाय जत्रोत्सवातील प्रत्येक दुकानात जाऊन प्लास्टिकचा वापर टाळा व कागदी अथवा कापडी पिशव्याचा वापर करा, असे बजावण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी योग्यरित्या असल्याचे कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष संजीत रॉड्रिग्स यांनी सांगितले. कचरामुक्त करण्यासाठी देवस्थानने पाऊल उचलेले होते. त्याला यश आले आहे. सर्वांच्या सहकार्याने जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त करण्यात यशस्वी ठरलो.

प्रत्येक दुकानाच्या बाहेर दोन कचरापेट्या ठेवण्यात आल्या आहे. पालिका कर्मचारी दोन्हीवेळा कचरा उचलण्याचे कम करीत आहेत. शिवाय अन्य कर्मचारी वर्ग सर्वत्र तैनात करून प्लास्टिक विरोधात जनजागृती करीत आहेत, असे देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी सांगितले. खजिनदार पांडुरंग कोरगावकर यांनी ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल नगराध्यक्ष रोहन कवळेकर, कचरा व्यवस्थापनचे संचालक संजीत रॉड्रिग्स आदींचे आभार मानले. यावेळी पालिका अभियंता मुन्ना मुझावर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, देवस्थानचे पदाधिकारी सचिव वासुदेव बिचोलकर, उपसचिव अशोक गोवेकर, उपखजिनदार सिद्धेश दिवकर, मुखत्यार नरेश तिवरेकर, उपमुखत्यार श्यामसुंदर पेडणेकर व मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते भाविकांना कापडी पिशव्या देण्यात आल्या. सर्वानी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष कवळेकर यांनी केले आहे. जत्रोत्सवाच्या ठिकाणी कापडी पिशव्यांचा स्टॉल लावण्यात आला आहे. भारत स्काऊट गाईडचे उत्तर गोवा अध्यक्ष शिरीष दिवकर यांच्यावतीने जत्रोत्सव ठिकाणी कचर्‍याविषयी जागृती फलक लावण्यात आले आहेत.