Tue, Nov 20, 2018 05:24होमपेज › Goa › मनोहर पर्रीकर पुन्‍हा रुग्‍णालयात

मनोहर पर्रीकर पुन्‍हा रुग्‍णालयात

Published On: Feb 25 2018 10:54PM | Last Updated: Feb 25 2018 11:00PMपणजी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रविवारी (दि.25) अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने रात्री उशिरा बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

पर्रीकर यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे सांगून तेथील डॉक्टरांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. यापूर्वी 15 फेब्रुवारी रोजी पर्रीकर यांना स्वादूपिंडाच्या विकारावरील उपचारासाठी मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पर्रीकर यांनी गुरुवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी विधानसभेत उपस्थित राहून सर्वांना धक्का देत अर्थसंकल्प सादर केला.

पर्रीकर सोमवार, दि.26 रोजी मंत्रालयात उपस्थित राहून कामकाजाला सुरुवात करणार होते, मात्र  रविवारी रात्री उशिरा त्यांना उपचारार्थ गोमेकॉत दाखल केल्याने नियमित कामकाजासाठी ते कार्यालयात उपस्थित राहण्याची शक्यता मावळली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी राज्यातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी विविध धार्मिक स्थळांवर प्रार्थना, जपानुष्ठान, हवन आदींचे आयोजन केले आहे.