Sat, Sep 22, 2018 11:04



होमपेज › Goa › मंगलोर एक्स्प्रेसवर फांदी पडून 1 ठार

मंगलोर एक्स्प्रेसवर फांदी पडून 1 ठार

Published On: Apr 11 2018 1:42AM | Last Updated: Apr 11 2018 1:42AM



मडगाव : प्रतिनिधी

सोसाट्याच्या वार्‍यासह पडलेल्या जोरदार पावसात मंगळवारी  संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंगळुरूहून मुंबईकडे जाणार्‍या   मेंगलोर एक्सप्रेस ट्रेनवर बाळ्ळी रेल्वे स्थानकाजवळ झाडाची फांदी तुटून पडल्याने दारात असलेला एक प्रवासी तोल जाऊन खाली पडल्याने मृत्युमुखी पडला. तर  राजेश नाईक, आर. जे. नाईक आणि एम. साजिद हे तिघे जखमी झाले. हॉस्पिसियोत  उपचारानंतर जखमींना घरी पाठवण्यात आले. दरम्यान, मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. 

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगावकडे येणार्‍या 12134 मेंगलोर एक्स्प्रेसच्या बोगीच्या दारात हा प्रवासी बसला होता, तर अन्य राजेश नाईक, आर.जे. नाईक आणि एम. साजिद हे राखीव डब्यात खिडकीजवळ होते. यावेळी झाडाची फांदी अचानक दारावर मोडून पडल्याने दारात असलेला प्रवासी तोल जाऊन खाली पडला. मोडून पडलेली फांदी रेल्वेच्या ब्रेक पाईपवर जाऊन आदळल्याने सदर ब्रेक पाईप फुटले आणि आपोआप गाडीचा ब्रेक लागला. त्यानंतर प्रवाशांनी रेल्वेच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधून एक प्रवासी खाली पडल्याचे आणि तीन प्रवासी जखमी झाल्याची त्यांना कल्पना दिली.

बबन घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळळी रेल्वे स्थानक  ओलांडल्यानंतर उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अन्य दोन महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत. या सर्वांवर बाळळी  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हॉस्पिसियोइस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत गोव्याचा कोणी नागरिक जखमी झालेला नाही, असे सांगून  रेल्वे सेवा सुरळीत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Tags : Goa, Mangalore, Express, falls, tree, kills, one