Sat, Jul 20, 2019 10:35होमपेज › Goa › मळा पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मळा पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:25AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मळा येथे गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे (जीएसआयडीसी) उभारलेल्या मळा आणि पाटो प्लाझा भागाला जोडणार्‍या मळा पुलाचे बुधवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते लोकार्पण झाले. हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला असून या पुलामुळे ताळगाव भागातून पाटोकडे जाण्याचे अंतर 2 किलोमीटरने कमी होणार आहे. पुलाच्या बांधकामास एकूण 24 कोटी रुपये खर्च आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी दिली. 

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते मळा येथील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा झाला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी  संवाद साधला. 

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, मळावासीयांचे पूल व्हावा, हे 25 वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मळा येथून बसस्थानकावर जाण्याचे फक्‍त दोन  रस्ते होते, ज्यामुळे  या ठिकाणी रोज वाहतूक कोंडीचा त्रास व्हायचा. मात्र, आता या पुलामुळे मळावासीयांना थेट पणजी कदंब बसस्थानक गाठता येईल. सध्या या ठिकाणचा एक पूल बांधून पूर्ण झाला आहे. या पुलाच्या बाजूस आणखी एका पुलाची बांधणी सुरू आहे.  सध्यासाठी हा रस्ता एकमार्गी (वन वे) ठेवण्यात आला असून पुलाजवळ सर्कल बांधण्यात येणार आहे. ते पूर्ण होताच वाहतूक सुरळीत होईल.

नवीन मळा पुलामुळे   भाटले,  मळा आणि ताळगाव भागातील लोकांना सोयीचे  होणार आहे.  सांताक्रुज, भाटले, आल्तिनो आणि ताळगाव भागातून पणजीमार्गे येणार्‍या वाहन चालकांना नवीन पाटो पुलामुळे थेट बसस्थानक गाठणे शक्य होणार आहे. बसस्थानकावर येण्यासाठी लागणारे सुमारे दोन किलोमीटर्सचे अंतर या पुलामुळे कमी होणार आहे, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली. लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुलाच्या एका बाजूने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संपूर्ण पुलाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, नगरसेवक शुभम चोडणकर, पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर व नगरसेवक व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.