Tue, Jul 16, 2019 13:37होमपेज › Goa › मांडवी तीरावर थ्रिडी स्वरूपात महात्मा गांधींची कलाकृती

मांडवी तीरावर थ्रिडी स्वरूपात महात्मा गांधींची कलाकृती

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:46PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मांडवी तीरावर गोवा मनोरंजन संस्थेसमोर लहानशी कृत्रिम झोपडी का उभारली आहे, हे आवर्जून पाहण्यासाठी प्रतिनिधी झोपडीत प्रवेश करतात. झोपडीत प्रवेश केल्यानंतर समोर महात्मा गांधीजी यांंचे छायाचित्र आणि सभोवताली शांतता असते. यानंतर गांधीजींच्या छायाचित्राकडे एकटक पाहिल्यानंतर गांधींजींच्या डोळ्यांची हालचाल होत असल्याचे जाणवते. नंतर त्यांचे पूर्ण छायाचित्र प्रतिसाद देत असल्याची जाणीव होते आणि अशा निरव शांततेत त्यांच्या हृदयाचे ठोके ऐकू  येतात. थ्रिडी अ‍ॅनिमेशनचा वापर करून ही कलाकृती तयार करण्यात आली आहे.

युक्रेनचे संगणक अभियंता डिमत्रो डोक्युनोव्ह यांच्या सहकार्याने ही अ‍ॅनिमेशन कलाकृती साकारण्यात आली आहे. गांधीजींच्या अशाप्रकारच्या कलाकृती थ्रिडी स्वरुपात ‘गांधी एआर’ अ‍ॅपमध्येही प्रतिनिधींना पाहता येते. ‘बापू कुटीच्या’ बाजूला निळ्या दगडांचे शिल्प ठेवण्यात आले आहे. त्यात गांधीजींच्या शिल्पांचा समावेश आहे. नवसो पवार यांनी हे शिल्प तयार केले आहे. महात्मा गांधींंच्या चंपारण्य येथील पहिल्या सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही शिल्पकला साकारण्यात आली आहे.

‘बापू कुटी’च्या काही अंतरावर जुने संगीत वाजविणारे स्पिकर लटकत आहेत.

‘बापूं’च्या हृदयाचे ठोके...

सभोवताली निरव शांतता, चारही बाजूने अंधार, समोर महात्मा गांधीजींचे छायाचित्र आणि त्यांच्या  हृदयाचे ऐकू येणारे ठोके हा अनुभव घेता येतो सेरेंडिपिटी महोत्सवात.  ही किमया आहे, थ्रिडी अ‍ॅनिमेशनची. मांडवी तीरावर उभारलली कृत्रिम ‘बापू कुटी’ ही संकल्पना चित्रकार सुबोध केरकर यांनी साकारली आहे.