Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Goa › राज्य चित्रपट महोत्सवात ‘महाप्रयाण’ सर्वोत्कृष्ट 

राज्य चित्रपट महोत्सवात ‘महाप्रयाण’ सर्वोत्कृष्ट 

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:39AMपणजी : प्रतिनिधी

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित 9 व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ‘महाप्रयाण’ तर व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार ‘के सेरा सेरा’ या चित्रपटांनी पटकावला. सिने सेलिब्रिटींसह राजकीय  मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. खासदार विनय तेंडुलकर, गिरीश केसरवल्ली, गोवा मनोरंजन संस्थेचे सीईओ अमेय अभ्यंकर यांच्या उपस्थितीत  सिनेमॅटोग्राफर  सूर्यकांत लवंदे यांना शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महोत्सवाच्या पुरस्कार वितरण व समारोप सोहळ्याला अभिनेत्री यामी गौतम, पल्लवी सुभाष, मृणाल कुलकर्णी,  चिन्मयी सुमीत, अभिनेता सुमित राघवन, जॅकी श्रॉफ या सिनेतारकांची उपस्थिती  होती.   प्रमुख पाहुणे म्हणून नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, खासदार विनय तेंडुलकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे सचिव दौलत हवालदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई म्हणाले, सध्या गोव्यात विविध विषयांवर  चित्रपट निर्मिती होत आहे. उत्तम कोकणी चित्रपट गोव्यात बनत  असून या पार्श्‍वभूमीवर गोव्यात एक फिल्मसिटी असणे आवश्यक आहे. सरकारने याबद्दल विचार करावा. राज्यात फिल्मसिटी झाली तर गोमंतकीयांना प्रोत्साहन मिळेल. तसेच गोव्यातील सिनेमागृहात कोकणी चित्रपटांना प्राईम टाईम मिळणे आवश्यक आहे, असेही सरदेसाई म्हणाले. 

‘आमी कॅमेरा फाटले मनीस’ असे म्हणून लवंदे यांनी राज्य सरकारकडून मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या तब्येतीसाठीदेखील त्यांनी यावेळी देवाकडे प्रार्थना केली. 

सोहळ्यात यशराज जोशी व गोव्याच्या प्रसिद्ध गायिका सोनिया सिरसाट यांचा सुरेल सांगितीक  कार्यक्रम झाला.  बेंगळुरू येथील इम्रान शेख व गोव्यातील ऑरटेंयिओ परेरा यांनी  विनोदी  कार्यक्रम सादर केला. त्याचप्रमाणे सिध्दाई या मुंबई येथील पथकाच्या तसेच गोव्यातील अमित व साक्षी यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढली. 

संस्थेच्या कला दालनात गोवा  कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे महोत्सवात कला प्रदर्शन भरवण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.