Fri, Jun 05, 2020 20:52होमपेज › Goa › ‘वयोश्री’ योजनेचा 30 हजार जणांना लाभ

‘वयोश्री’ योजनेचा 30 हजार जणांना लाभ

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:42AM

बुकमार्क करा

मडगाव ः प्रतिनिधी

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा देशातील सुमारे 30 हजार ज्येष्ठ नागरिकांना लाभ झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी पूरक साहित्य उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंंद गेहलोत यांनी शनिवारी मडगाव रवींद्र भवनमधील आयोजित कार्यक्रमात दिली. त्यांच्या हस्ते दक्षिण गोव्यातील दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना पूरक शारीरिक साहित्य वितरीत करण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय वयोश्री योजनें’तर्गत दक्षिण गोव्यातील एक हजार चारशे सात ज्येष्ठ नागरिकांना हे साहित्य देण्यात आले. मडगावमधील रवींद्र भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात चष्मा, दाताची कवळी, चालताना आधारासाठी आधुनिक काठी (ट्रायपॉड), चाकाची खुर्ची व श्रवणयंत्र इत्यादी साहित्य प्रत्यक्ष लाभार्थींच्या हाती सोपविण्यात आले.

केंद्रीय मंत्री गेहलोत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करताना दुर्बल, दिव्यांग, अनुसूचित अशा सर्वांना सबल करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत व या संदर्भात गेल्या साडेतीन वर्षात सुमारे 5 हजार 890 शिबिरांचे आयोजन मंत्रालयातर्फे करण्यात आले. पाच ते सहा वयोगटातील कर्णबधीर मुलांवर शस्त्रक्रिया करून त्यांना ऐकण्यास व बोलण्यास सक्षम करण्याचे कार्य देखील केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने हाती घेतले आहे.

या अंतर्गत आजपर्यंत देशातील सुमारे 1 हजार मुलामुलींवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या एका शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाख रुपये इतका होतो. या उपक्रमामुळे हजारपैकी नऊशेहून अधिक मुले ऐकू व बोलू लागली आहेत. यामध्ये गोव्यातील तीन मुलांचा समावेश असून नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती गेहेलोत यांनी दिली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, विशेष अतिथी म्हणून गोवा राज्याचे सामाज कल्याण व ऊर्जा मंत्री पांडुरंग मडकईकर, दक्षिण गोव्याचे लोकसभा सदस्य नरेंद्र सावईकर तसेच दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली शेरावत उपस्थित होत्या.

या कार्यक्रमानिमित्त गेहलोत यांनी उपस्थितांना आपल्या परिचयातील 5 ते 6 वर्षाखालील कर्णबधीर मुलांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्यक्रमात मान्यवरांनी केले.