Fri, Jul 19, 2019 20:09होमपेज › Goa › व्यापार परवाना नसल्याने चार दुकाने सील

व्यापार परवाना नसल्याने चार दुकाने सील

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:50AMमडगाव  :  प्रतिनिधी

मडगाव शहरात व्यापार परवाना न घेता दुकान थाटून बसलेल्यांवर नगरपालिकेने गुरुवारी पुन्हा छापा टाकला व चार दुकानांना सील ठोकले. बुधवारी दहा दुकानांना सील ठोकले होते. मडगाव पालिकेच्या मागच्या परिसरात कॅनेरा बँकच्या समोरच्या चार दुकानांना सील ठोकण्यात आले. मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून मार्केट  निरीक्षक हसीना बेगम, कर विभागातील अधिकारी अभय राणे, दिलीप कारपूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई  पार पडली.  शहारत  परवान्याशिवाय व्यापार चालत असल्याने पालिका क्षेत्रातील दुकानांवर काल गुरुवारी पुन्हा  कारवाई करण्यात आली.   मडगाव नगरपालिकेने मालभट येथील इंद्रप्रसाद इमारतीत पाच व मार्केट परिसरातील रंगवी इमारतीतील पाच अशा दहा दुकानदारांकडे व्यापार परवाना नसल्याने  बुधवारी कारवाई केली होती.  त्यानंतर या दुकानांना सील ठोकण्यात आले. 

पालिकेने गुरुवारी केलेल्या कारवाईत रुबी स्टोअर, दुर्गा कॉम्प्लेक्स मधील गॅलेक्सी स्टोअर, मिरांडा कॉम्प्लेक्स मधील नेट ग्लोबल, या भागातील एक स्पेअर पार्ट्स दुकानाला सील ठोकण्यात आले. 
कोणतीही पूर्व कल्पना देताच ही कारवाई करण्यात आल्याने बाजारात गोंधळ उडाला. दरम्यान, पालिकेत सकाळी साडे नऊ पासून संध्याकाळी सहापर्यंत अनेक व्यापार्‍यांची व्यापार परवान्या संबंधी काम पूर्ण करण्यास गर्दी  केली होती.  अधिकारी अभय राणे म्हणाले, की व्यवसाय परवाना प्राप्त नसलेल्या दुकानदारांना कर भरण्यासाठी पालिकेने खास मोहिमेतून संधी उपलब्ध करून दिली होती. त्यास दुकानदारांनी प्रतिसाद न दिल्याने मुख्याधिकारी जोन्सन यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. 

हसीना बेगम यांनी पुढरीशी बोलताना सांगितले, की शहारत अनेक दुकानदार व्यापार परवान्याशिवाय दुकान चालवतात. बुधवारी व काल गुरुवारी असे दोन दिवस शहरातील अनेक दुकानांवर छापे मारले व त्यांना व्यापार परवाना सादर करण्यास सांगितले. मालभट येथील इंद्रप्रसाद इमारतीतील  दुकान मालकांकडे व्यापार परवाना विचारला असता त्यांचा गोंधळ उडाला त्या दरम्यान व्यापार परवाना नसलेली पाच दुकाने समोर आली. हा असाच प्रकार  रंगावी इमारतीतही झाला. या इमारतीतही तब्बल पाच दुकाने व्यापार परवान्याशिवाय चालवत असल्याचे समोर आले. कारवाई पुढेही चालूच राहिल, असे त्या म्हणाल्या