Mon, Mar 25, 2019 02:48
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › पर्यटकांची गैरसोय  

पर्यटकांची गैरसोय  

Published On: Jan 20 2018 1:39AM | Last Updated: Jan 20 2018 12:53AMमडगाव : प्रतिनिधी

टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या संपामुळे मडगाव रेल्वेस्थानक आणि कदंबा बसस्थानकावर उतरलेल्या देशी आणि विदेशी पर्यटकांना बरीच गैरसोय सहन करावी लागली. सरकारकडून बसस्थानकावरून बसेसची सोय केली होती. मात्र, बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना पायपीट करून बसेस गाठाव्या लागल्या. मडगाव रेल्वेस्थानकावर दरदिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक उतरत असतात. रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूनी टॅक्सी सेवा कार्यरत असल्याने या पर्यटकांना आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी फार दगदग करावी लागत नव्हती. मात्र, टॅक्सी चालकांनी पुकारलेल्या संपाविषयी पर्यटकांना काहीच माहिती नसल्याने त्यांच्यावर चालत जाण्याची वेळ आली.

अनेक पर्यटकांनी मडगाव रेल्वे स्थानकानजीकच्या हॉटेलमधील रूमवर आपली तात्पुरती व्यवस्था केल्याचे दिसून आले. रेल्वे स्थानकाबरोबर कदंब बस स्थानकावरसुद्धा लोकांची गर्दी झाली होती. कोलवा समुद्र किनार्‍यावर थांबलेल्या पर्यटकांना मात्र अडचणीचा सामना करावा लागला.अनेक पर्यटकांनी शुक्रवारी मूळ गावी जाण्यासाठी विमानांचे बुकिंग केले होते. बंगळूर येथील विलास खेमू यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, गेल्या आठवड्याभरापासून आपण कुटुंबासह कोलवात आहोत. शुक्रवारी पहाटे परत जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढले होते. मात्र, टॅक्सी चालकांच्या आंदोलनाविषयी हॉटेल व्यवस्थापनाने कोणतीच माहिती न दिल्याने तिकीट रद्द करता आले नाही.