Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Goa › दूधसागरसाठी जीपसंख्येवर मर्यादेने पर्यटकांचा हिरमोड

दूधसागरसाठी जीपसंख्येवर मर्यादेने पर्यटकांचा हिरमोड

Published On: Dec 07 2017 1:33AM | Last Updated: Dec 06 2017 11:31PM

बुकमार्क करा

मडगाव ः विशाल नाईक

जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र  असलेला दूधसागर धबधबा पाहण्यासाठी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांचा हिरमोड होत असून त्यांना मागे फिरावे लागत आहे. पर्यटकांना दूधसागर धबधब्याकडे नेणार्‍या जीपगाड्यांची संख्या राज्य सरकारने 225 इतकी कमी केली आहे. त्यामुळे सुमारे दीड हजार पर्यटकांना माघारी परतावे लागत आहे.
ऐन पर्यटन हंगामात पर्यटक माघारी परतू लागल्याने जीप व्यावसायिक, स्थानिक दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्नाला मुकावे लागत आहे. कुळे-शिगाव पंचायतीचे उत्पन्न दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याची प्रतिक्रिया सरपंच गंगाराम लांबोर यांनी दिली. दक्षिण गोव्यात दूधसागर धबधबा हे सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र आहे.र दररोज चार हजार देशी आणि विदेशी पर्यटक दूधसागरचे सौंदर्य पाहण्यासाठी कुळे येथे दाखल होत आहेत.

स्थानिक जीप व्यावसायिक सेबी मिरांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुळेत खाण व्यवसाय नाही. दूधसागर धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांंमुळे येथे पर्यटन व्यवसाय हेच लोकांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. येथील बेरोजगार युवकांनी बँकांतून कर्ज घेऊन जीपगाड्या खरेदी केल्या होत्या. पर्यटकांना केवळ पर्यटन हंगामात दूधसागर येथे ने-आण करण्याच्या मोबदल्यात उत्पन्न मिळते. अनेकांनी या गाड्यांचे हप्ते अजून पूर्ण भरलेले नाहीत. जीप गाड्यांवर घातलेल्या मर्यादांमुळे हजारो पर्यटकांना दूधसागर न पाहता मागे वळावे लागत असून भविष्यात पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती मिरांडा यांनी व्यक्त केली.

कुळे-शिगावचे सरपंच गंगाराम लांबोर म्हणाले, दूधसागरवर जाता न आलेल्या पर्यटकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदविणे सुरू केले असून या प्रतिक्रिया वाचून आता पर्यटक दूधसागरऐवजी दुसर्‍या पर्यटनस्थळाचा पर्याय शोधत आहेत. दूधसागरकडे जाण्यासाठी गुजरातसह इतर  राज्यांतील देशी पर्यटक आणि विदेशी पर्यटक आदल्या रात्रीच कुळे गावात दाखल होतात. त्यांच्यामुळे स्थानिक हॉटेल्सना व्यवसाय मिळतो. 

जीप मिळविण्यासाठी सकाळी लवकर रांगा लागतात. सरकारने फक्त 225 जीप गाड्या सोडण्याची सक्ती केल्याने सर्व पर्यटकांना दूधसागर पाहण्याची संधी मिळत नाही. परिणामी अनेक पर्यटक नाराज होत आहेत, त्यामुळे वादावादीही होते. अनेकवेळा कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होण्याच्या घटना येथे घडलेल्या आहेत.

सरकारने प्रारंभी, या भागातील युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने 431 जीपगाड्यांना परवानगी दिली होती. या कामातून गाडीचा हप्ता, वन खात्याची प्रवेश फी, रस्ता कर, प्रवासी कर आदी भरणे शक्य होत होते. या वर्षीपासून केवळ 225 जीप गाड्या सोडण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने कर्ज कसे फेडावे, असा प्रश्‍न जीप मालकांना पडला आहे. सरपंच लांबोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना लाईफ जॅकेट पुरविण्याचे काम पंचायतीकडून केले जाते. पंचायतीकडेदोन हजार लाईफ जॅकेट्स आहेत. त्यांचे भाडे पंचायतीला मिळत असून ते कमी झाले आहे.  जॅकेटस् देण्यासाठी अकरा युवकांची  नियुक्ती पंचायतीने केली आहे.