Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Goa › दक्षिण गोव्याचा विकास साधणार

दक्षिण गोव्याचा विकास साधणार

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:16PM

बुकमार्क करा
मडगावः प्रतिनिधी

दक्षिण गोवा गोव्याचाच भाग आहे. उत्तर गोव्याप्रमाणे दक्षिण गोव्यातही विकासकामे राबवली जात आहेत. ज्या रिकामटेकड्यांना काहीच विषय सापडत नाहीत ते विषय शोधून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. अशा लोकांच्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये. हे सरकार दक्षिण गोव्याला काहीच कमी पडू देणार नाही, असे प्रतिपदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. मडगाव आणि फातोर्डा मतदारसंघासाठी नॉर्थ ट्रंक मेनमध्ये ट्रेंचलेस पद्धतीने मलनिस्सारण वाहिनी टाकण्याबरोबर, ती कार्यान्वित करण्याच्या कामाची पायाभरणीप्रसंगी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, शहर आणि नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई, मडगावचे आमदार दिगंबर कामत, संजीव देसाई, मडगावच्या नगराध्यक्षा बबिता आंगले, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक उपस्थित होते.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की 2019 पर्यंत गोवा हे पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ होण्याबरोबर कचरा मुक्त व्हावे असे आपले स्वप्न आहे. प्लास्टिकचा वापर बंद होण्यासाठी येत्या काही दिवसांत सुमारे दोन लाख कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे. गेल्या सहा वर्षात उच्च मार्गावरील चार हजार टन कचरा उचलण्यात आला आहे. मडगावात मलनिस्सारण वाहिनीचा विषय संपुष्टात आला असला तरी कोलवा येथील दुसर्‍या टप्प्याचे काम होणे शिल्लक आहे. या वहिनीची लहान मोठ्या शहरांना आवश्यकता आहे. मडगाव होणार्‍या कचर्‍यासाठी वेर्णा औद्योगिक वसाहतीत 48 हजार चौरस मीटर जागा पाहण्यात आली आहे. येथे लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. साळगावचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्या अगोदर त्या ठिकाणी दोन लाख टन कचरा पडून होता. त्यामुळे जवळच्या झरीही  प्रदूषित झाल्या होत्या. तो प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की राज्याला उत्पन्न आणि रोजगार निर्मितीसाठी पर्यटनाची आवश्यकता आहे. मात्र, पर्यटनाच्या माध्यमातून जादा कचरा निर्माण होतो. एका पंचतारांकित हॉटेलमधून दर दिवशी सहाशे शॅम्पूच्या बाटल्या तर एका हॉटेलमधून बॅरल भरून सांबार कचर्‍याच्या स्वरूपात येते. साळगावच्या प्रकल्पात दिवसाला पाचशे काटे चमचे येतात. या सर्व कचर्‍यावर वेळेत प्रक्रिया न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात आम्हाला भोगावे लागतील. वेस्टर्न बायपासमुळे पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने उपाय काढला जाईल. पाण्याचा मार्ग तसाच ठेवला जाईल. त्यावर बारा मीटरचे पूल बांधले जाईल. साळ नदीत साचलेला गाळ आणि झाडे झुडुपे हे पाणी तुंबण्याचे मुख्य कारण आहे. या संबंधी आपण जलस्रोत खात्याशी चर्चा केली आहे. त्यावर उपाय काढला जाईल, असे ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले, की आमदारांनी विरोधासाठी म्हणून विरोध करू नये. मलनिस्सारण वाहिनीच्या कक्षेत नविन जिल्हा इस्पितळ घेतले जाईल. त्या कामाला तीन महिन्यांत  सुरुवात केली जाईल. मडगाव, फातोर्डा आणि नावेली मतदारसंघात चारशे कोटींची कामे केली आहेत.  शहर आणि नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि   दिगंबर कामत यांनी मनोगत व्यक्त केले.