होमपेज › Goa › कुयणामळ-सांगेत निर्घृण खून 

कुयणामळ-सांगेत निर्घृण खून 

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 25 2017 12:00AM

बुकमार्क करा

मडगाव ः प्रतिनिधी

कुयणामळ सांगे येथे एकाचा  निर्घृणपणे खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सांगे परिसरात रविवारी खळबळ माजली. दरम्यान, सदर मृतदेह शनिवारपासून बेपत्ता असलेले आपले काका शांताराम यांचाच असून जमिनीच्या वादातून त्यांचा खून झाला असावा, असा संशय त्यांचे पुतणे महाबळेश्‍वर शिरोडकर यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाणार असून चाचणीनंतर मृतदेह कोणाचा हे स्पष्ट होणार आहे, असे पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगे येथे केशकर्तनाचा व्यवसाय करणारा कुयणामळ सांगे येथील शेतकरी शांताराम शिरोडकर हा सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक घरातून बेपत्ता असून त्याच्या     
घरापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर एका खड्ड्यात नव्वद टक्के जळालेल्या स्थितीत  मृतदेह आढळून आला.  तो आपल्या काकांचा असल्याचा संशय शिरोडकर यांनी व्यक्त केला असून  कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीवरून सांगे पोलिसांनी संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महाबळेश्‍वर यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले की, शांताराम यांच्या हातात अंगठी आणि सोनसाखळी असायची. मृतदेहावर पोलिसांना या वस्तू सापडलेल्या नाहीत. ते म्हणाले की, बागायतीतील अनावश्यक झाडे कापून नुकतीच काजू बागायत स्वच्छ करण्यात आली होती. ज्या खड्ड्यात मृतदेह आढळून आला त्या खड्ड्यात आग लागण्यासारखे काहीच नव्हते. मृतदेहाच्या गळ्याभोवती एक जळालेली केबल सापडली आहे. मृतदेह बाहेर काढताना जळलेल्या स्थितीतील त्यांचे घड्याळ आणि फुटलेला मोबाईल सापडला आहे. हा एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केलेला खून असावा, अशीही शक्यता  आहे. महाबळेश्‍वर  म्हणाले,    शनिवारपासून  काका शांताराम गायब होते.

काकीला ते बागायतीत गेल्याचे वाटले. रात्रभर ते घरी आले नाहीत.काकी आपल्या मुलीच्या घरी पणजीला  गेल्या होत्या. रविवारी सकाळी त्या घरी आल्या असता शांताराम घरी नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यांना सुरूवातीला ते कुंकळ्ळीला जत्रेला गेल्याचे वाटले. मात्र त्यांचा फोन बराच वेळ बंद असल्याने त्यांनी आपल्याला त्यांचा शोध घेण्यासाठी कुयणामळ येथील काजू बागायतीत पाठवले. तेथे पाहिले असता बागायतीला आग लागून सुमारे सातशे मीटरचा परिसर जळाल्याचे दिसले. जवळच शांताराम यांची चप्पल आढळून आली. काही अंतरावर त्यांची कॅप पडली होती. तर आणखी पुढे त्यांचा कोयता आढळून आला.

महाबळेश्‍वर यांनी सांगितले की, घटनेचे गांभीर्य ओळखून आपण त्वरित आपल्या भावाला त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. सांगे पोलिसांनी पंचनामा करून श्‍वानपथकाला पाचारण केले असता श्‍वानपथक रस्त्यावरच काहीकाळ घुटमळले. आगीत कॅप, चपला सुरक्षित !  महाबळेश्‍वर यांनी सांगितले की, संपूर्ण परिसराला आग लागून काजू बागायत जाळून टाकण्यात आली असली तरी चपला, कॅप आणि कोयत्याची प्लास्टिक मूठ मात्र जळालेली नव्हती. जवळच जळालेला मृतदेह व मृतदेहाशेजारी पाच भटकी कुत्री बसल्याचे  दिसून आले. मृतदेहाचा एक हात तुटून एक मीटर दूर पडला होता. तर कुत्र्यांनी एक पाय नेऊन सुमारे दोनशे मीटर दूर लोकवस्तीत टाकला होता.