Tue, Jun 02, 2020 19:37होमपेज › Goa › नववधूची गाडी अडकली वाहतूक कोंडीत

नववधूची गाडी अडकली वाहतूक कोंडीत

Published On: Jan 06 2018 1:21AM | Last Updated: Jan 05 2018 11:13PM

बुकमार्क करा
मडगाव ः प्रतिनिधी

मालवाहू रेल्वे येण्याच्या वेळी रेल्वे फाटक बंद राहिल्याने  झालेल्या वाहतूक कोंडीत    गुरूवारी एका वधूची गाडी अडकून पडली. चांदोर येथील रेल्वे फाटकापासून अवघ्या शंभर मीटर्सवर  चर्च असूनही फाटक उघडून   वराजवळ पोहचण्याला वधूला तब्बल दीड तास लागले.या प्रकारामुळे वधूपक्षाला आणि वर्‍हाडींना मनस्ताप सोसावा लागला. जोवर उड्डाणपूल होत नाही तोवर रेल्वे क्रॉसिंगवर तासन्तास वाट पाहत राहण्याखेरीज गोमंतकीयापुढे पर्यायच   राहिलेला नाही,असे े उपस्थितांनी उद्विग्नपणे सांगितले.   

   सविस्तर वृत्त असे, की चांदोर येथील क्रॉसिंगवर गुरुवारी रेल्वे जाण्याच्या वेळी फाटक बंद करण्यात आले.सुमारे दीड तास हे फाटक बंद होते.त्यामुळे फाटकाच्या दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती. यात प्रवाशी बसेस,चिरे वाहतूक करणारे ट्रक तसेच कार्सचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.तासाभरात मालवाहू  रेल्वे येऊन गेली आणि फाटक उघडून वाहनांना रस्ता मोकळा करण्यात आला.मात्र रांग सुटणार असे वाटत असताना पाच मिनिटातच  फाटक पुन्हा बंद करण्यात आले.त्यामुळे सुमारे दहा गाड्याच सुटल्या उर्वरित रांग तशीच कायम राहिली.

या वाहतूक कोंडीत पणजी येथील एका वधूची गाडी सुद्धा अडकून पडली होती.या वधूचा वर तिच्या पूर्वीच चांदोर येथील चर्च मध्ये पोहचला होता.चांदोर येथील चर्चपासून अवघ्या शंभर मीटर्स अंतरावर हे फाटक असून वधूची गाडी फाटकाच्या अलिकडे अडकून पडली होती.त्याच बरोबर बसने आलेले इतर वर्‍हाडी सुद्धा फाटकाच्या अलिकडे अडकून पडले होते.पुन्हा फाटक बंद झाल्याने काही वर्‍हाडी मंडळीनी बसमधून उतरुन चालत फाटक ओलांडले.फाटक खुले करेपर्यंत विवाहाचा मुहुर्त टळून गेला.या प्रकारामुळे वधू पक्षाला नाहक मानस्ताप सहन सोसावा लागला.

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर यावर उपाय काढावा ,अशी मागणी स्वयंसेवी संघटनेचे सदस्य सावियो गोमिश यांनी केली आहे. गोमिश  ‘पुढारी’शी बोलताना  म्हणाले की, सध्या रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरू असून अनेक वेळा तासंन्तास रेल्वे फाटक बंद करून लोकांना अडवून ठेवले जाते. रात्रीच्या वेळीदेखील फाटक बंद ठेवण्यात येत असल्याने उशिरा ये जा  करणार्‍या महिलांनाही अंधारात फाटक उघडण्याची वाट पहात थांबावे लागते.