होमपेज › Goa › मडगाव पोलिसांनी केली सीसीटीव्ही फुटेजची मागणी 

मडगाव पोलिसांनी केली सीसीटीव्ही फुटेजची मागणी 

Published On: Feb 01 2018 1:47AM | Last Updated: Feb 01 2018 1:47AM मडगाव : प्रतिनिधी

मडगावातील  लॉयोला हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता आठवीत शिकणार्‍या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांला  शिक्षा म्हणून जबर मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी मडगाव पोलिसांनी या प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. दरम्यान, मुख्याध्यापक बासिलियो वेगो यांनी अटकपूर्व जामिनासाठी बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला  आहे.   या प्रकरणाचे तीव्र पडसाद मडगाव, फातोर्डा भागात उमटले आहेत. संबंधित विद्यार्थ्याच्या वडिलांनी मुख्याध्यापक बासिलियो वेगो यांच्या विरोधात मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मडगावचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लॉयोला हायस्कूलमध्ये जाऊन घटनेचा पंचनामा केला.

यावेळी संबंधित विद्यार्थ्याचे पालक उपस्थित होते. पोलिसांनी या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज लॉयोलाच्या व्यवस्थापनाकडे मागितले आहे. पोलिस निरीक्षक नायक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुख्याध्यापकांच्या चौकशीसाठी पोलिस गेले होते, मात्र ते  बुधवारी शाळेत अनुपस्थित राहिल्याने तपास पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान, मुख्याध्यापक वेगो यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात केलेल्या अर्जावर गुरुवारी  सुनावणी होणार आहे. लॉयोला हायस्कूलमध्ये  पोलिसांबरोबर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. पोलिसांनी हॉस्पिसियो प्रशासनाकडे जखमी विद्यार्थ्याच्या वैद्यकीय दाखल्याची मागणी केली आहे.