Sun, Oct 20, 2019 01:07होमपेज › Goa › जमीन वादातून चुलत्याला मारले

जमीन वादातून चुलत्याला मारले

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:04AM

बुकमार्क करा
मडगाव ः प्रतिनिधी

कुयणामळ येथील शांताराम शिरोडकर (वय 73) या आपल्या चुलत्याचा बागायत जमिनीच्या वादातून आपणच दंडुक्याने मारहाण करून खून केल्याची कबुली त्यांचा पुतण्या संशयित जय शिरोडकरने पोलिसांना दिल्याने गेले दहा दिवस न उलगडलेल्या खुनाच्या रहस्यावरून अखेर मंगळवारी पडदा उठला. जमिनीच्या वादात शांताराम यांचा खून केल्यानंतर हे प्रकरण अंगलट येईल, या भीतीने बससाठी वापरले जाणारे डिझेल ओतून त्यांना जाळून टाकल्याचीही कबुली पोलिस तपासात  जयने दिली. सांगे पोलिसांनी दहा दिवसांत या प्रकरणाचा छडा लावून संशयिताने गुन्ह्यात वापरलेला दंडुका आणि डिझेलचा कॅनही जप्त केला.

शांताराम शिरोडकर यांच्या कुयणामळ येथील काजू बागायतीत दहा दिवसांपूर्वी एका खड्ड्यात जळालेल्या स्थितीतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेच्या आदल्या रात्रीपासून शांताराम आपल्या घरातून गायब होते. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी आग लागून सुमारे पाचशे मीटर परिसरातील बागायत जळून गेली होती. मृतदेहाशेजारी शांताराम यांची कॅप, चपला आणि कोयता सापडला होता. तर मृतदेहावर त्यांचे घड्याळ, सोन्याची चेन आणि जळलेला मोबाईल सापडला होता. कुत्र्यांनी मृतदेहाचा पाय तोडून गावात नेऊन टाकला होता. प्रथमदर्शनी हा मृतदेह शांताराम यांचाच असावा, अशी शक्यताही वर्तवली गेली. मात्र, तपासात अडथळा नको म्हणून त्यांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. दरम्यान, शांताराम यांची कन्या साची उसपकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगे पोलिसांनी जय शिरोडकर आणि त्याचे वडील रोहिदास शिरोडकर या दोघांना ताब्यात घेतले होते. जय शिरोडकर याच्यावर संशय अधिक होता.