Wed, Mar 20, 2019 08:32होमपेज › Goa › मडगावात ११ पासून ‘गोवा सरस’ महोत्सव

मडगावात ११ पासून ‘गोवा सरस’ महोत्सव

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 08 2018 10:35PM

बुकमार्क करा
 मडगाव ; प्रतिनिधी

केंद्र सरकार आणि  ग्रामीण विकास खाते यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 22  जा नेवारीपर्यंत मडगावात दक्षिण गोवा विकास प्राधिकरणाच्या जागेत ‘गोवा सरस’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी  माहिती ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर यांनी दिली मडगावात ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे  घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री साळगावकर बोलत होते. खात्याचे संचालक वासुदेव शेट्ये, प्रकल्प अधिकारी मीना नाईक गोलतेकर, अनुजा फळदेसाई, शिवाजी देसाई, अँजेलो फर्नांडिस आदी उपस्थित होते. 

‘गोवा सरस’  महोत्सवामध्ये स्वयं साहाय्य गटाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.   त्या शिवाय नाटक, जादूचे प्रयोग, राजस्थान, गुजरात, ओरिसा या राज्यातील कलाकारांचा नृत्याविष्कार तसेच कोल्हापूर येथील कलाकारांचा गंध लोककलेचा हा कार्यक्रम होणार असल्याचे साळगावकर यांनी सांगितले.  देशातील अठरा राज्यातील स्वयंसाहाय्य गट आपले स्टॉल्स ‘गोवा सरस’ मध्ये मांडणार आहेत. यात राजस्थान, गुजरात, ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, मेघालय, पंजाब, तामिळनाडू  या राज्यांचा समावेश असल्याचे मंत्री साळगावकर यांनी सांगितले. 

स्थानिक स्वयंसाहाय्य गटांना सरस पहाण्याची संधी मिळावी तसेच इतर राज्यातील स्टॉल्सचा अनुभव  घेता यावा हा आयोजना मागील हेतू आहे, असे मंत्री साळगावकर  म्हणाले. स्वयंसाहाय्य गटांचे दोन फुडकोर्ट या कार्यक्रमाचे आकर्षण ठरणार आहेत.या ठिकाणी स्थानिक गोमंतकीय पदार्थांचा आस्वाद लोकांना घेता येणार आहे. पार्किंग सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरा, अग्निशमन दलाची यंत्रणा, वैद्यकीय उपचारांची सुविधा, डॉक्टर आणि परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती  मंत्री साळगावकर यांनी दिली. गेल्या   सरस महोत्सवामध्ये विविध  राज्यातील 260  कलाकारांनी सहभाग घेतला होता.  आयोजनासाठी अठरा लाख खर्च करण्यात आले होते. एकूण उत्पन्न एक कोटी  नऊ लाख रुपये झाले, अशी माहिती साळगावकर यांनी दिली.