Wed, May 22, 2019 23:00होमपेज › Goa › दक्षिण गोव्यात ईडीसीमुळे दोन हजार रोजगार निर्मिती

दक्षिण गोव्यात ईडीसीमुळे दोन हजार रोजगार निर्मिती

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 1:41AMमडगाव : प्रतिनिधी

सत्तेत असलेल्या कोणत्याही सरकारला वर्षाला अडीच हजारपेक्षा जास्त सरकारी नोकर्‍या उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे ईडीसी ने जास्तीत जास्त अर्थसाहाय्य योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. प्रत्येक आमदारांना या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघात किमान शंभर उद्योजक निर्माण करता आले तर सहज दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ईडीसीच्या दक्षिण गोवा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर, आमदार नीलेश काब्राल, एलिना साल्ढाणा, ईडीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षा बबिता आंगले आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. 

पर्रीकर म्हणाले, की ईडीसीच्या योजना तळागाळात नेणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांना अनेक योजनांची माहिती नाही, त्यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक  व्यवसायासाठी धोका पत्करावा लागतो. मात्र, अर्थसहाय्य आणि कर्ज पुरवताना शासकीय अधिकारी धाडस करीत नसतात. त्यांना पैसे बुडण्याची भीती जास्त असते. अधिकर्‍यांनी कर्ज बुडण्याची भीती बाळगू नये. तंबाखूजन्य पदार्थ आणि दारु व्यवसाय याच्या व्यतिरिक्त अन्य कोणात्याही व्यवसायाला कर्ज पुरवले जाईल.
 

 मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत 25 लाख तर स्वयंसाहाय्य गटांना 75 लाख रुपये अर्थसहाय्य केवळ 1.6 टक्के व्याज दराने पुरवले जाणार आहे. कोणतीही बँक अशा व्याजावर कर्ज देत नाही. अशा सुविधा असताही आत्तापर्यंत केवळ सात हजार लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. नगरविकास मंत्री विजय सरदेसाई म्हणाले, की सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना लोकांसाठी अमलात आणण्यात आलेल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोचाविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.  सिध्दार्थ कुंकळकर यांनी योजनांविषयी माहिती दिली.