Thu, Apr 25, 2019 21:37होमपेज › Goa › कुपन्स विक्रीसाठी विद्यार्थ्यांना जुंपल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

कुपन्स विक्रीसाठी विद्यार्थ्यांना जुंपल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

Published On: Dec 18 2017 2:30AM | Last Updated: Dec 18 2017 1:08AM

बुकमार्क करा


मडगाव ः प्रतिनिधी 

अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लॉटरी कुपन्स खपविणार्‍या आणि दिलेल्या मुदतीत कुपन्स खपवू न शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर हाकलणार्‍या चांदोर येथील त्या शैक्षणिक संस्थेसंदर्भातील वृत्त दै.‘पुढारी’त प्रसिद्ध होताच शिक्षण खात्याने त्याची गंभीर दखल घेऊन भाग शिक्षणाधिकार्‍यांना या प्रकरणाची चौकशी करून सोमवार (दि.18) पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

चांदोरस्थित शिक्षण संस्थेत शिकणार्‍या अनेक मुलांना शनिवारी वर्गाबाहेर काढून त्यांना लॉटरी कुपन्स खपविण्याकरिता लोकांच्या दारात पाठविण्यात आले होते. लॉटरी कुपन्स खपत नसल्याने नाईलाजाने मुलांनी रस्त्यावर येऊन वाहने अडवून वाहनचालकांकडे देणगी देण्यासाठी याचना चालवली होती.काही पालकांशी याबाबत चर्चा केली असता आधी कुपन्स खपवा आणि नंतरच वर्गात या, असे फर्मान शाळेने काढल्यामुळे मुलांना रस्त्यावर उतरणे भाग पडल्याचे सांगण्यात आले.

शनिवारी घडलेल्या या प्रकाराचे गंभीर पडसाद चांदोर आणि आसपासच्या भागात उमटले. काही पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घालून याविषयी जाब विचारला. त्यावर आपण मुलांना वर्गाबाहेर पाठवलेच नव्हते, असे मुख्याध्यापकांकडून सांगण्यात आले. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी शिक्षण संचालकांनी पत्रकारांकडून पुरावे घेतले आहेत. संचालक गजानन भट यांनी सांगितले की, भाग शिक्षण अधिकार्‍यांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून सोमवारपर्यंत त्यांचा अहवाल मागवला आहे. तो अहवाल आल्यानंतरच संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.