Thu, Jun 20, 2019 01:59होमपेज › Goa › मडगावात नाताळची जय्यत तयारी 

मडगावात नाताळची जय्यत तयारी 

Published On: Dec 16 2017 1:41AM | Last Updated: Dec 15 2017 10:34PM

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण अवघ्या 9 दिवसांवर येऊन ठेपला असून मडगाव शहरात सर्वत्र नाताळाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रमुख चर्चमध्ये यासाठी सजावटीचे आणि गोठ्याचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. शिवाय बाजारपेठेत आकर्षक भेटवस्तू, भेटकार्डे आणि जिंगल बेल्स विक्रीसाठी दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे.
गोव्यातील धार्मिक एकतेचे तसेच सलोख्याचे आदर्श असे उदाहरण असलेल्या नातळसाठी महागाईची पर्वा न करता लोक मोठ्याप्रमाणात साहित्यांची खरेदी  करत आहेत.

सणाचे  आकर्षण असलेला येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा (गोठा) तयार करण्यात तरुणाई मग्न आहे. आपला गोठा इतरांपेक्षा कसा वेगळा असेल याकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे जाणवत आहे. या काळात आयोजित करण्यात येणार्‍या स्पर्धात भाग घेण्यासाठीही तरुणाई उत्सुक आहे. बदलत्या काळात सार्वजनिक नाताळगोठे गावोगावी जरी दिसत असले तरीही प्रत्येकांच्या घरात किंवा अंगणात खासगी नाताळगोठे उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. या नाताळगोठयांची तयारी प्रत्येक गावात वीस दिवस अगोदरच सुरू होते.

त्यात प्रामुख्याने मूर्तीचे सेट, ख्रिसमस ट्री, मेणबत्त्यांचे अनेक प्रकार, चांदण्यांच्या आकाराचे आकाशदिवे, तारे, दिव्यांची रोषणाई व सांताक्लॉजचे मुखवटे यांच्या खरेदीचा व नंतर वेळ काढून मांडणीचा समावेश आहे. काही परिसरात नाताळगोठयात देखाव्यांच्या मार्फत सामाजिक प्रश्‍नांवर लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील भेटवस्तूंच्या दुकानांतही ख्रिसमसचा प्रभाव जाणवू लागला आहे. अनेक आकर्षक भेटवस्तू आणि शुभेच्छा कार्ड्स जिंगल बेल, ख्रिसमस ट्री ची प्रतिकृती, फुगे आणि अन्य सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. तसेच खास ख्रिसमस केक, पेस्ट्रीज, चॉकलेट्सही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक वस्तूची किंमत त्याचा आकार आणि दर्जानुरूप आहे.

अनेक दुकानदारांनी ख्रिसमससाठी फेस्टिव्हल ऑफर्स सुरू केल्या आहेत. त्यामुळे सवलतीच्या दरातही साधने उपलब्ध आहेत.  बाजारपेठेत विविध आकारांत सांताक्लॉजचे मुखवटे विक्रीसाठी आले असून, त्याच्या टोप्या  100 रुपयांपासून  उपलब्ध आहेत.  नाताळ सणाची उत्सुकता नवीन वर्षाच्या अगमनापर्यंत असते.   तयार केलेल्या गोठ्यांचे हे देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी सुद्धा होत असते. विविध धर्मातील लोक एकमेकांच्या घरी जातात. सर्व धर्मात आनंद वाटणारा, वाढवणारा सण म्हणून नाताळ सणाकडे पाहिले जाते.