Sun, Nov 18, 2018 23:59होमपेज › Goa › सासष्टीत नाताळ, नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

सासष्टीत नाताळ, नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:37PM

बुकमार्क करा

मडगाव ः  प्रतिनिधी 

नाताळ व नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सासष्टी तालुक्यात  झाली आहे. रविवार असल्याने तसेच सलग सुट्यांमुळे नाताळसाठी बाजारात खरेदीसाठी झुंबड उडालेली असल्याचे मडगाव बाजारात दिसून आले.   गेल्या चार पाच दिवसांपासून  सासष्टीतील किनारी भागात, तसेच इतर पर्यटनस्थळांवर पर्यटक भेटी देऊ लागले आहेत,त्यातच काल रविवारी गर्दीने किनारे फुलून गेल्याचे दिसून आले.   स्थानिकांसह पर्यटकांनीही नाताळ व त्यानंतर येणार्‍या नववर्षाचे स्वागत  करण्यास आपल्या पसंतीची हॉटेल्स व ओपन पार्टी हॉल्सचे बुकिंग करून ठेवले  आहे.    

नववर्ष स्वागतासाठी गोवा हे जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण बनले असल्याने  स्थानिक तसेच देशी व विदेशी पर्यटकांसाठी राज्यातील विविध हॉटेल्स, शॅक्स तसेच क्रुझ बोटींवर विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील  व्यावसायिकही पर्यटकांच्या स्वागतासाठी  सज्ज  झाले आहेत.   कोलवा, बाणावली, माजोर्डा, यासारख्या शहराजवळच्या किनारपट्ट्यांवर आतापासून  हजारो पर्यटकांची गर्दी झालेली आहे. स्थानिक तसेच पर्यटक हिवाळ्यासह आकर्षक देखाव्यांचाही आनंद घेतात.  

देशी व  विदेशी पर्यटकांनी समुद्र किनार्‍यावरील हॉटेल्सचे 2-3 महिने  आधी ऑनलाईन बुकिंग करून ठेवले होते. काही  पर्यटक दरवर्षी गोव्यात येत असल्याने त्यांचे बुकिंग आधीच ठरलेे आहे. अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंटस्मध्ये  फॅमिली तसेच नवविवाहित जोडप्यांसाठी विविध पॅकेजीस ठेवली  आहेत.   वाढत्या पर्यटकांची गर्दी मडगाव बाजरपेठेतही दिसत आहे. आकर्षक तसेच सजावटीच्या विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलली आहे. मडगावात वाढत्या गर्दीमुळे  वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.  नाताळच्या पार्श्‍वभूमीवर विविध प्रमुख रस्त्यांवर पाच सहा दिवसांपासून  चार पोलिस तैनात केले आहेत.  शहरात  पार्किंगची समस्या  जटील बनली  आहे.