होमपेज › Goa › शिक्षणतज्ज्ञ भिकू पै आंगले यांचे निधन

शिक्षणतज्ज्ञ भिकू पै आंगले यांचे निधन

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:39AMमडगाव : प्रतिनिधी

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक, साहित्यिक तथा नामवंत शिक्षणतज्ज्ञ भिकू पै आंगले यांचे मंगळवार, दि.20 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  मृत्यूसमयी त्यांचे  वय 94 होते.   त्यांच्या पार्थिवावर मडगावच्या स्मशानभूमीत बुधवारी (दि.21) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भिकू पै आंगले यांच्या निधनाबद्दल साहित्य, नाट्य, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्‍त केले आहे. भिकू आंगले यांच्या पश्‍चात   बंधू दामोदर, वहिनी नंदिनी, माजी रणजीपटू असलेले पुत्र हेमंत, सून इंदिरा, हरी तसेच नातवंडे, विवाहित कन्या स्मिता गजानन सौदागर व अन्य परिवार आहे. नाट्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेल्या आंगले यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1924 रोजी बोरी येथे झाला. 1946 पासून त्यांनी महाराष्ट्रात शिक्षकी पेशात काम केले. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. एल. हायस्कूल व ज्युनियर  कॉलेजच्या  र्यपदावरून ते 1981 साली निवृत्त झाले.

त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने 1973 साली आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केेले. निवृत्तीनंतर  गोव्यात आल्यावर प्रारंभी ते विद्याविकास महामंडळ आणि नंतर मठग्रामस्थ हिंदू सभा या दोन शैक्षणिक संस्थांसाठी कार्यरत होते. मठग्रामस्थ हिंदू सभेच्या दामोदर उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत सल्लागार म्हणून सक्रियपणे काम करायचे.