होमपेज › Goa › मडगावात मंगळवारी ‘अस्मिता जागर’ 

मडगावात मंगळवारी ‘अस्मिता जागर’ 

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 10:46PM

बुकमार्क करा
मडगाव प्रतिनिधी

 येथील लोहिया मैदानावर जनमत कौल दिनानिमित्त 16 जानेवारी  रोजी संध्याकाळी 4.30 वाजता  ’अस्मिता जागर’ हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी  पत्रकार परिषदेत दिली.   ज्या स्वाभिमानी गोमंतकीयांनी गोव्याची स्वतंत्र ओळख जपण्यासाठी लढा पुकारला,अशा थोर व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे,असेही त्यांनी सांगितले. सरदेसाई म्हणाले,काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 16 जानेवारी हा दिवस अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले याचे सर्व श्रेय गोवा फॉरवर्ड पक्षाला जात असून  पक्षाच्या अथक प्रयत्नांनंतर सदर बाब शक्य झाली. गोवा फॉरवर्डच्या ह्या विजयामुळे अनेक राजकीय पक्षांना धक्का बसला आहे,अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

काँग्रेस पक्षाला मागच्या 50 वर्षात जे शक्य झाले नाही ते गोवा फॉरवर्ड पक्षाने काही काळातच करून दाखविले,असे   उद‍्गारही त्यांनी यावेळी काढले. ते म्हणाले,  काँग्रेस   दिवाळखोर पक्ष बनला असल्याने नारळाच्या विषयावरूनही त्यांनी राजकारण चालवले आहे. गेल्या पोटनिवडणुकीत पणजीतून निवडणूक लढविवेलेले गिरीश चोडणकर हे मडगावातच ठिय्या मांडून असल्याने पणजीतील काँग्रेसी जनतेला कोणी वाली उरलेला नाही. यामुळे निवडणुकीत गिरीश यांना  मते दिलेल्या लोकांची स्थिती  दयनिय झालेली आहे. चोडणकरांनी त्यांच्या मतदारांना वार्‍यावर सोडले आहे, असा टोमणाही त्यांनी यावेळी हाणला.  गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यावेळी  उपस्थित होते.