Tue, Mar 19, 2019 05:12होमपेज › Goa › कृषि पर्यटनावर देणार भर

कृषि पर्यटनावर देणार भर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

कृषी विकासाबरोबरच कृषिपर्यटन करण्यावरही भर दिला जाणार आहे. यासाठी पहिला प्रयोग म्हणून फातोर्डा मतदारसंघातील आगाळी येथे 4 ते 5 कोटींचा बंधारा बांधण्यात येणार आहे. हा प्रयोग करून पाहण्यासाठी आगाळी येथील पडीक भागही शेती लागवडीखाली आणण्यासाठी शेतकर्‍यांना बियाणा बरोबरच कुंपण बांधून देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.

व्ही फॉर फातोर्डा यांनी लुपिन कंपनीच्या सहकार्याने शनिवारी मंत्री सरदेसाई यांच्याहस्ते फातोर्डा मतदारसंघातील शेतकर्‍यांना बियाणे व खताचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सदर माहिती दिली. 

मंत्री सरदेसाई म्हणाले, की गोव्यात पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी आगाळी येथील शेत जमीन प्रायोगिक तत्वावर लागवडीखाली आणण्यात येणार आहे. यासाठी कृषी खात्याद्वारे कुंपण व इरिगेशन सुविधाही देण्यात येणार आहे. सर्व जमीन लागवडीखाली आणल्यानंतर व बंधारा बांधल्यानंतर या जागेला एक पर्यटन केंद्राचे रूप येणार आहे. शेतीबरोबरच कृषी पर्यटन करण्यासाठी कृषी खाते प्रयत्नशील असणार आहे. गोव्यातील पडीक शेती लागवडीखाली आणण्यासाठी कंत्राटीपद्धतीने शेती करण्याची गरज आहे. यासाठी सरकार अनुदानही द्यायला तयार आहे. फातोर्डा मतदारसंघातील शेतकरी संघटीत राहत आहेत. शेतकर्‍याच्या सशक्तीकरणासाठी व्ही फॉर फातोर्डा संघटना नेहमीच प्रयत्नशील राहील. 

पीक कापणी झाल्यावर शेतकर्‍यांना बाजारपेठही तयार करून देण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या भल्यासाठी सरकारचा निधी कमी पडत असल्यास व्ही फॉर फातोर्डा संघटना मदत करणारआहे, असेही मंत्री सरदेसाई यांनी सांगितले. संघटनेच्या अध्यक्षा उषा सरदेसाई, उपगराध्यक्ष टिटो कार्दोज, कृषी उपसंचालक संदीप फळदेसाई, नगरसेवक पीटर फर्नांडिस, कृषी अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.