होमपेज › Goa › तारीपाटो-सांगेतील बेकायदा डोंगर कापणीवर कारवाई करणार

तारीपाटो-सांगेतील बेकायदा डोंगर कापणीवर कारवाई करणार

Published On: Feb 14 2018 2:51AM | Last Updated: Feb 14 2018 2:10AMमडगाव : प्रतिनिधी

तारीपांटो सांगे येथे नगरनियोजन खात्याचे सर्व नियम ढाब्यावर बसवून डोंगर कापणी सुरू असून डोंगर कापणी करताना मोठ्याप्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आल्याचे वृत्त दैनिक पुढारीतून प्रसिद्ध झाल्यानंतर वन खात्याने दखल घेत झाडांची कत्तल झाल्याप्रकाराची पाहणी केली आहे. सांगे वन विभागाचे वन अधिकारी सुहास नाईक यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले, की सदर जमीन मालकाचा शोध सुरू असून तो व्यक्ती सापडल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल.

    तारीपांटो येथील रामकृष्ण नाईक यांनी डोंगरकापणी विरोधात संबंधित अधिकारी आणि शासकीय कार्यालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रार दाखल करूनही कारवाई करण्यात आली नव्हती. तर दुसर्‍या बाजूने डोंगर कापणी बरोबर झाडे कापण्याचे काम जोरात सुरू ठेवण्यात आले होते. दैनिक पुढारीतून या विषयीचे वृत्त प्रसिद्ध होताच वन खात्याला जाग आली. वन अधिकारी सुहास नाईक यांनी त्वरित तारीपांटो येथे भेट देऊन पाहणी केली आहे.

झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पण सदर जमिनीच्या मालकाने झाडे कापण्यासाठी लागणारी परवानगी सांगे वन कार्यालयाडून घेतलेली नाही. या जागेच्या मालकाविषयी चौकशी सुरू आहे. तो जमीन मालक सापडल्या शिवाय गुन्हा दाखल करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान,  रामकृष्ण नाईक म्हणाले, की तक्रार दाखल करूनही शासकीय अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने आपल्या व आजू बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. आपण केपेच्या नगरनियोजन कार्यालयात डोंगर कापणीविषयी तक्रार केली होती. मात्र, नगरनियोजन कार्यालयाकडे सांगेत पाहणी करण्यास येण्यासाठी वाहन नसल्याने त्यांनी अध्याप पाहणी केलेली नाही. येथे कापण्यात येणार्‍या डोंगरामुळे नागरिकांत अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे नाईक यांनी सांगितले.