Wed, Mar 27, 2019 06:11होमपेज › Goa › साहित्यिकाला दुसर्‍यांचे दुःख समजून घेता यावे

साहित्यिकाला दुसर्‍यांचे दुःख समजून घेता यावे

Published On: Feb 04 2018 2:14AM | Last Updated: Feb 04 2018 2:10AMमडगाव  प्रतिनिधी

साहित्य हे सत्य आणि मवाळ असले पाहिजे. चांगले साहित्य लिहिण्यासाठी चांगले आयुष्य जगणे गरजेचे आहे. जीवनात झगमगटाला काहीच अर्थ नाही. साहित्यिकाला दुसर्‍याचे दुःख समजून घेता आले पाहिजे. इतरांचे दुःख समजले नाही तर सकस साहित्याची निर्मिती होणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यकार डॉ. अनिल अवचट यांनी केपे येथे केले. केपे येथे सरकारी महाविद्यालयाच्या सभागृहात गोवा मराठी अकादमी आयोजित दुसर्‍या महामराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने अवचट बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, स्वागताध्यक्ष आणि माजीमंत्री  प्रकाश वेळीप,  महाविद्यालयाचे प्राचार्य जयदीप भट्टाचार्य, उपप्राचार्य अशोक मानगुटकर,अशोक नाईक तुयेकर,गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, दीपक देसाई व इतर मान्यवर  उपस्थित होते.     अवचट म्हणाले, की  आपण पत्रकारितेचा अनुभव घेतला आहे. त्यावेळी पत्रकारितेत फार मोठा मोबदला मिळत नव्हता. आपले एक मित्र मुंबईत टाइम्स ऑफ इंडियाच्या आवृत्तीत संपादक होते. त्यांनी माझे साहित्य टाइम्सला पाठवण्याची संधी दिली होती. मोबदला ही बर्‍याच प्रमाणात मिळणार होता. पण इंग्रजीत आलेले लेख, बातम्या सामान्य वाचकांना समजणार नाहीत. ज्याच्या साठी आपण लिखाण करतो, त्या घटकांना आपले साहित्य समजावे या विचारातून आपण ती संधी नाकारली  होती. 
 

  खासदार नरेंद्र सावईकर म्हणाले, की समाजाच्या आणि भाषेच्या विकासाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. या कर्तव्य भावनेने सर्वांनी एकजूट होऊन कार्य केल्यास मराठी भाषेची प्रगती निश्चित होईल. भाषेचा विषय येतो तेव्हा वादाची सुरुवात होते. पण सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे की, मातृभाषेने आम्हाला घडवले आहे. आम्हाला विचार करण्याची ताकत दिली आहे. या मातृभाषेचा विसर कधिच पडू देऊ नये. गोमंतकाची ख्याती ज्यांनी सातासमुद्रा पार पोचवली आहे, त्यांच्यावर संस्कार मातृभाषेने केलेले आहेत याची आठवण प्रत्येकाने ठेवावी.विद्यार्थ्यांनी वाचनालयात जाऊन साहित्याचे वाचन करावे. समारंभात पाहुण्यांना फुलांचे महागडे गुच्छ देण्यापेक्षा  पुस्तके भेट द्यावीत. पुस्तकातील ज्ञानाची किंमत कधीच कमी होत नाही. काळानुसार पिढी आपल्या परीने बदलत चालली आहे. आपली मातृभाषा आणि संस्कृती पुढे नेणार्‍या पिढीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली आहे.  

कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले, की मराठी साहित्य आणि मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल तर प्राथमिक शिक्षण मराठीतून व्हावे.  इतर भाषांचा द्वेष  नाही. पण, संस्कार आपल्या मातृभाषेतून व्हावेत. मराठीने संतांचे आचार विचार दिले आहेत. ज्ञानेश्वरांनी आपल्याला मराठीतून ज्ञानेश्वरी  दिली. मुक्ताईने माया दिली. जनाबाईंच्या ओव्या दिल्या. जिजाऊंने अंगाई दिली. शिवरायांची विरता दिली. तुकारामांनी अभंग दिले अशा मायमराठीचा गजर करणे सर्व गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. 

अनिल सामंत यांनी  सांगितले, की विद्यार्थ्यांनी या संमेलनाचे धोरण समजून घ्यावे. मराठी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे.  संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी आपले विचार मांडले.  अभिनेत्री वर्षा उसगावकर, माजी आमदार सुभाष फळदेसाई,वासुदेव मेंग गावकर, चंद्रकांत मळकर्णेकर आदी   उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपास्थिती लावली होती.उद्घाटनापूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या पालखिकेची सभागृहाबाहेर मिरवणूक काढण्यात आली.