Fri, Apr 26, 2019 15:39होमपेज › Goa › पर्यटक अजूनही न्यू ईयर सेलिब्रेशन मूडमध्ये

पर्यटक अजूनही न्यू ईयर सेलिब्रेशन मूडमध्ये

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 02 2018 11:53PM

बुकमार्क करा
मडगाव ः  प्रतिनिधी

नाताळ संपला,नववर्ष स्वागताचे  सर्व कार्यक्रम संपून गोमंतकीय आपापल्या कामाला देखील लागले,पण अजून  पर्यटकांचा न्यू इयर काही संपलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन आणि अंमली पदार्थ सेवनावर  कायद्याने बंदी असली तरी, लांब   किनारपट्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलवा बीचवर पर्यटक उघडपणे दारूच्या बाटल्या घेऊन बैठका मारू लागले आहेत.   31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करण्यासाठी हजारोंच्या संख्येने देशी पर्यटक कोलव्यात आले होते.समुद्र किनार्‍यावर असलेल्या शॅकवर रात्रीच्या वेळी संगीत रजनीचे कार्यक्रम चालत असल्याने कर्नाटक,महाराष्ट्र आदी जवळच्या राज्यातून आलेल्या देशी पर्यटकांना पैसे खर्च करून डिस्कोत जावे लागत नाही.

त्यामुळे नवीन वर्ष साजरे करण्या साठी अनेक लोक कोलवा या  सुंदर किनार्‍याला पसंती देतात.आता नववर्ष सुरू होऊन तीन दिवस उलटून गेले पण कोलवा समुद्र किनार्‍यावरील देशी पर्यटकांची गर्दी काही कमी झाली नाही.या पर्यटकांना घडविणारा कोणीच नसल्याने गटा गटात समुद्र किनार्‍यावर बसून दारू ढोसण्याचे काम हे लोक करत आहेत. पर्यटन खात्याने समुद्र किनार्‍यावर सूचना फलक उभारून समुद्र किनार्‍यावर  मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन करू नये, अशा सूचना देऊन या ठिकाणी दारू पिणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आणि तुरुंगवासाची शिक्षा असल्याचे सूचित केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष करून पर्यटकांनी उघडपणे किनार्‍यावर बसून  मद्यप्राशन  सुरू केले आहे.

काही पर्यटकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले,की कर्नाटकात व्हिस्कीच्या ज्या बाटलीची किंमत एक हजार रुपये आहे,त्याची गोव्यात केवळ तीनशे रुपये किंमत आहे. जो पर्यंत आम्ही सर्व गोव्यात आहोत,तोवर भरपूर दारू प्यायची आहे.दृष्टी च्या सुरक्षा रक्षकांनी सांगितले,की लोक उघडपणे किनार्‍यावर दारूच्या बाटल्या घेऊन बसतात.त्यांना हटकले तरी ते ऐकत नाहीत.सायंकाळी उशिरा नशेत पाण्यात उतरणार्‍या पर्यटकांना सांभाळणे कठीण होते.रात्री उशिरापर्यंत पर्यटक किनार्‍यावर बसून मद्यप्राशन करताना आढळतात.  काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालत असल्याने महिला पर्यटकांसाठी ती डोकेदुखी बनत आहेत. स्थानिक पंचायत सदस्य मिनिनो फर्नांडिस यांनी सांगितले, की दारू पिऊन धिंगाणा घालणार्‍या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करावी. नववर्षाच्या कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या समुद्र किनार्‍यावर पडून होत्या असे त्यांनी सांगितले.