Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Goa › शहरात राजरोसपणे बेकायदा ‘नर्सरी’चा व्यापार

शहरात राजरोसपणे बेकायदा ‘नर्सरी’चा व्यापार

Published On: Feb 19 2018 1:29AM | Last Updated: Feb 19 2018 1:29AMमडगाव :प्रतिनिधी

मडगावात मागील आठवड्यात पालिकेने राबविलेल्या कारवाईत शहरातील तब्बल 24 दुकाने व्यापार परवान्याशिवाय चालत असल्याने त्यांना सील ठोकले. त्याचप्रमाणे शहरात  गेल्या 15  वर्षांपासून विविध ठिकाणी फ्रूट अ‍ॅण्ड प्लांट नर्सरी व्यापार परवान्या शिवाय चालत आहे. हा बेकायदेशीर व्यापार शहराच्या प्रवेशद्वारापासूनचसुरू होतो. या व्यापाराच्या माध्यमातून आकर्षक केमिकलयुक्‍त फुल झाडांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे. कायद्यानुसार हा दंडात्मक गुन्हा असल्याने या बेकायदेशीर व्यापारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. 

घरात  स्वतःची एक सुंदर फुलझाडांची बाग असावी, असे अनेकांचे स्वप्न असते. शहरात रस्त्याच्या बाजूला असणार्‍या नर्सरीतील आकर्षक झाडे ग्राहकांचे मन वेधतात. ताजी टवटवीत दिसणारी झाडे ग्राहकांच्या भुरळ घालत असतात. मात्र, अनेक ठिकाणी  बेकायदा फ्रुट अ‍ॅण्ड प्लाट नर्सरी ग्राहकांची फसवणूक करतात. पालिका अधिकार क्षेत्रात सुरू असलेला व्यापार परवान्याशिवाय दुकानांवर मडगाव नगरपालिकेने कारवाई करत गेल्या तीन दिवसांत 24  दुकानांना सील ठोकले आहे. ज्या दुकानदारांकडे व्यापार परवाना नाही, अशा दुकानांवर मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. या कडक कारवाईमुळे शहरातील चोरटे व्यापार करणार्‍यांची तारांबळ उडाली होती. 

बुधवारी मालभट येथील इंद्रप्रसाद इमारतीत पाच व मार्केट परिसरातील रंगवी इमारतीतील पाच अशा दहा दुकानांवर पालिकेकडून कारवाईला सुरुवात होताच या भागातील व्यवसाय परवाना नसलेल्या दुकानदारांनी कारवाईच्या भीतीने सायंकाळी दुकाने बंद ठेवली होती. काहींनी दुसर्‍या दिवशीही दुकाने उघडी केली नाही. ही अशीच कारवाई गुरुवारी व शुक्रवारीही करण्यात आली होती. गुरुवारी रुबी स्टोअर, दुर्गा कॉम्प्लेक्समधील गॅलेक्सी स्टोअर, मिरांडा कॉम्प्लेक्समधील नेट ग्लोबल व या भागातील एक स्पेअर पार्टस् या चार दुकानाला सील ठोकण्यात आले आहे.  

शुक्रवारी व्यापार परवाना नसलेल्या  9 दुकानांना सील ठोकले. शहरात अशी अनेक दुकाने आहेत, जी व्यापार परवान्याशिवाय चालत आहेत. पालिकेने गेल्या तीन महिन्यांपूर्वीच शहरातील व्यापार्‍यांना परवाना घेण्यास आवाहन केले होते.  व्यापार्‍यांना येणार्‍या अडचणी समजून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, यावेळी पालिकेला अल्प प्रतिसाद मिळाला. या योजनेचा 180 व्यापार्‍यांनी लाभ घेतला होता. मात्र, शहरातील ठरावीकच व्यापार परवाना घेतल्याने इतर ठिकाणी होणार्‍या बेकायदा व्यापारावर कारवाईचे आदेश मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी दिल्यानंतर कारवाईला जोर आला.

फ्रूट अ‍ॅण्ड प्लांट नर्सरीचा बेकायदा व्यापार थांबावा

ज्या प्रमाणे शहरात व्यापार परवान्याशिवाय बेकायदा व्यापार होतो. त्याचप्रमाणे फ्रूट अ‍ॅण्ड प्लांट नर्सरीचा बेकायदा व्यापारही अनके ठिकाणी सुरू आहे.  शहारील मुख्य रस्त्याच्या कडेला असणार्‍या या नर्सरीच्या बेकायदा व्यापारामुळे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ग्राहकांची फसवणूक होत आहे. उघडपणे सुरू असलेल्या व्यापारावर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने गोवा कॅन सारख्या बिगर सरकारी संघटना ग्राहकांच्या हितासाठी आवाज उठवत आहे. गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन्स व लॉर्णा फर्नांडिस ग्राहकांना सतर्क ठेवण्यास विविध जागृती मोहिमेद्वारे मार्गदर्शन करत असतात.

गोवा कॅनचे निमंत्रक रोलांड मार्टिन यांनी सांगितले, की, गोवा नर्सरी मेन असोसिएशन आणि गोव्याच्या वनस्पतिक सोसायटीच्या प्रतिनिधींसह कृषी विभाग आणि आयसीएआर यांनी नर्सरीचे निरीक्षण केल्यास नर्सरी कंपनीने 75 रुपये कुंकळळी नगरपालिकेला दैनिक सोपो म्हणून बाजार फी देते, असा दावा करणारी पावती हाच व्यापार चालविण्यासाठी परवाना असल्याचे  मानत आहे. काही नर्सरीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या झाडांना काही दर्जा नसतो. त्यांना निकृष्ट दर्जाची खते वापरली जातात. झाडांना रोग होऊ नये म्हणून जादा प्रमाणातर कीटकनाशक फवारे मारले जातात. यामुळे नर्सरीत आकर्षक दिसणारी झाडे विकत घेऊन घरी गेल्यानंतर कोमजत असतात. कालांतराने या झाडाचे दुष्परिणाम इतर झाडांवरही होतात.

शहराच्या प्रवेशद्वारावर 5 बेकायदेशीर नर्सरी

मडगाव, नावेली, फातोर्डा, नुवे आदी  ठिकाणी मुख्य मार्गवर  फ्रूट अ‍ॅण्ड प्लांट नर्सरी आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच तब्बल पाच नर्सरी असून या पाचही बेकायदेशीर आहेत. या पाचही नर्सरीने शहराच्या महामार्गाकडील सुमारे 680 चौरस मीटर जागा आकारली आहे. हा व्यापार मोठ्याप्रमाणात वाढलेला आहे. प्रत्येक नर्सरी जवळपास  100 ते 150 चौरस मीटर जागेत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलझाडे उपलब्ध आहे. त्यामुळे याकडे ग्राहक आकर्षित होत असतात. 50, 100, 150  200 तर काही खास फुलझाडांच्या रोपट्यांची किंमत 500 ते हजार रुपयांपर्यंतही आहे. रंगीबेरंगी फुलांची बाग मुख्य रस्त्याकडेला असल्याने व्यापार चांगला होतो.

मात्र, यात ग्राहकांची फ सवणूक होत असते.  द गोवा फ्रुट अँड प्लांट नर्सरीज कायदा 1995 च्या नुसार राज्य सरकारने गेल्या महिन्यात व्यापार परवाना लवकरच प्राप्त करावा, यासाठी  नोटिसा जाहीर केल्या होत्या. मात्र, याला अल्प प्रतिसाद लाभला. राज्यात 1998 सलात एकूण 140 नर्सरीने व्यापार परवाना घेतला होते. तो पुन्हा 2003 सालात परवाना नूतनीकर करण्याची तारीख होती. त्यावेळी केवळ 25 नर्सरीच्या मालकांनी परवान्याचे नूतनीकरण केले होते. आता राज्यात या नर्सरीची संख्या वाढली आहे. यातील काही नर्सरीत बेकायदेशीर व्यवहार चालतो आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.  

 नर्सरीचा व्यापार  सर्वांसाठी डोकेदुखी

महामार्गावर वाढणारा बेकायदेशीर प्लांट नर्सरीचा व्यापार सर्वांसाठी डोकेदुखी बनत आहे. शहरातील कोणत्याच नर्सरींना पार्किंगची सोय नाही. मडगाव शहराच्या प्रवेशद्वारावर व मडगाव  नावेली मार्गावर असलेल्या नर्सरीमुळे ग्राहक आपल्या गाड्या रस्त्याच्याकडेला पार्क करून खरेदी करण्यास जातात. गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क केल्याने वाहनांची गर्दी वडून ट्रॅफिक जाम होत असते. हे मुख्य रस्ते असल्याने झाडे खरेदीसाठी कुठेही वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी होत असते. यामुळे याचा त्रास शहरात ये-जा करणार्‍या व्यक्‍तींना होत आहे.  नर्सरीचे हातगाडे शहरातील मुख्य रस्त्यावरून विक्री करतात ते ही चुकीचे आहे. या बेकायदेशीर हातगाड्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.