Wed, Jun 26, 2019 11:26होमपेज › Goa › पेडामळ-शिरवईत 20 बेकायदा घरे जमीनदोस्त 

पेडामळ-शिरवईत 20 बेकायदा घरे जमीनदोस्त 

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AMमडगाव  : प्रतिनिधी

शाळकरी मुलांना पुढे करून कारवाई   रोखण्याचा परप्रांतीयांचा डाव मोडून काढत कोमुनिदाद प्रशासकाने  पेडामळ शिरवई येथील कोमुनिदादच्या जमिनीत बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली 20  घरे मंगळवारी  जमीनदोस्त  केली. कारवाईवेळी कायदा आणि  सुव्यवस्थेसंबंधी समस्या निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून 105  पोलिसांचा फौजफाटा पेडामळ येथे  तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे उर्वरित 126 घरांवर कारवाईची तलवार  लटकत आहे.

एका रात्रीत रस्त्यावर आलेल्या 20 कुटुंबांनी आपण लाखो रुपयांना फसवले  गेलो  असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली. पेडामळ येथील कारवाईसाठी सांगे, केपे, कुडचडे आणि कोणकोण पोलिस स्थानकाचे एकशे पाच पोलिस हजर होते. शिवाय महिला गृहरक्षकांची मदत घेण्यात आली होती.  
कोमुनिदादचे प्रशासक परेश फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

केपेचे मामलतदार प्रताप गावकर यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी कुडचडे पोलिस स्थानकाचे निरीक्षक रवींद्र देसाई, कोणकोणचे राजेंद्र प्रभुदेसाई, केपेचे मनोज म्हार्दोळकर, केपेचे पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई उपस्थित होते. कारवाईला सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सुरुवात होताच येथील  लोकांनी सुमारे दोनशे शाळकरी मुलांना  आणि महिलांना रस्त्यावर उभे केले आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुलांना बाजूला काढण्यास काहींनी विरोध केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच लोक बाजूला झाले. कारवाईसाठी दोन जेसीबी यंत्रे आणि दोन टिप्पर ट्रक मागविण्यात आले होते. मामलतदार प्रताप गावकर यांनी लोकांना स्वतःहून साहित्य बाहेर काढण्याचे आवाहन केले आणि त्यानंतर घरे पाडण्याचे काम हाती घेण्यात आले.  सात जणांनी स्वतः  घरांवरील पत्रे बाजूला करून बांधकाम पाडणार्‍या पथकाला सहकार्य केले.

सकाळच्या सत्रात तासाभरातच सात बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. बहुतांश घरांना वीज आणि पाणी जोडणी देण्यात आली होती. मामलतदारांच्या आदेशावरून कारवाईपूर्वी वीज खात्याला वीज जोडणी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. या कारवाईवेळी अनेक घरामध्ये छुपे भंगार अड्डे चालविण्यात येत असल्याचे उघडकीला आले.कारवाईवेळी लोकांनी ते भंगाराचे साहित्य बाजूला काढले.

काही घरात नोंदणी क्रमांक नसलेल्या दुचाकी लपवून ठेवण्यात आल्या होत्या, पोलिस येत असल्याचे पाहून दुचाकी आणि अनेक प्रकारचे संशयास्पद साहित्य बाहेर काढण्यात आले. कोमुनिदादचे प्रशासक परेश फळदेसाई यांनी सांगितले की, 88/1 आणि 88/2 या सर्व्हे क्रमांकाच्या जागेत बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली 20 घरे पाडण्यात आली. या सर्व कुटुंबांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. या जमीन विक्री प्रकरणात अजून कोणत्याही अ‍ॅटर्नीचे नाव समोर आलेले नाही. कोणी तक्रार दिल्यास चौकशी केली जाईल, असेही फळदेसाई म्हणाले.