होमपेज › Goa › शासकीय मुद्रणालयाचे मडगावस्थित कार्यालय बंदच

शासकीय मुद्रणालयाचे मडगावस्थित कार्यालय बंदच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव : प्रतिनिधी

येथील कोमुनिदाद इमारतीतील   शासकीय मुद्रणालयाचे  कार्यालय बंद होऊन  तीन वर्षे  उलटलेली आहेत.सरकारने नव्या कार्यालयासाठी माथानी साल्ढाणा प्रशासकीय संकुलात जागा दिली होती. मात्र त्या जागेत आधीच सामान भरलेले असल्याने अद्याप त्या ठिकाणचा ताबा मुद्रणालयाला अद्याप मिळालेला नाही.दक्षिण गोव्यातील एकमेव कार्यालय बंद पडल्याने  सासष्टी,केपे,सांगे,काणकोण आणि धारबंदोडा या पाच तालुक्यातील लोकांवर गेल्या तीन वर्षांपासून पणजीत हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.

गोवा कॅन या स्वयंसेवी संघटनेने सरकारला याबाबत पत्र पाठवले असून आगामी आर्थिक वर्षापासून मडगावातील शासकीय मुद्रणालयाचे कार्यालय पुन्हा कार्यान्वित करावे, अशी मागणी केली आहे.काही वर्षे कोमुनिदाद इमारतीत मुद्रणालयाचे कार्यालय सुरू होते.दक्षिण गोव्यात हे एकमेव कार्यालय असल्याने लोकांना सरकारी राजपत्र,नियम ,कायदे आदींच्या प्रति सहज उपलब्ध होत असत.सुमारे तीन वर्षांपूर्वी अचानक हे कार्यालय बंद पडले तेव्हा पासून सांगे,केपे,सासष्टी,धारबांदोडा, आणि काणकोण भागातील  लोकांवर मुद्रणालयाच्या पणजीतील   कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.नुकतीच मुद्रणालयाकडून 2018 सालची सरकारी दिनदर्शिका केवळ चाळीस रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात आली होती.मडगावातील काऊंटर बंद असल्याने लोकांना चाळीस रुपयांची सरकारी दिनदर्शिका पणजीतून खरेदी करण्यासाठी प्रवासावर पाचशे रुपये खर्च करण्याची वेळ आली होती.

गोवा कॅन चे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले,की डिसेंबर 2016 मध्ये दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून या विषयी माहिती देण्यात आली होती.त्या नुसार सरकारने माथानी साल्ढाणा संकुलात कार्यालय   हलवले असून भाडेशुल्काच्या मुद्द्यामुळे स्थलांतराचे काम अडल्याचे एक पत्राद्वारे गोवा कॅनला  कळविल्याची माहितीही त्यांनी दिली. मार्टिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार माथानी साल्ढाणा संकुलातील तळ मजल्यावरील बारा क्रमांकाच्या खोलीत  शासकीय मुद्रणालयासाठी कार्यालय देण्यात आले आहे. नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी दक्षिण गोव्यासाठी मडगावात  कार्यालय सुरू करावे,अशी मागणी रोलंड मार्टिन्स यांनी केली आहे.
 


  •