Sat, Apr 20, 2019 10:41होमपेज › Goa › सामूहिक बलात्कार; तीन संशयितांना अटक

सामूहिक बलात्कार; तीन संशयितांना अटक

Published On: May 27 2018 1:18AM | Last Updated: May 27 2018 12:07AMमडगाव ः प्रतिनिधी

सेर्नाभाटी येथे युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने 24 तासांत तिघाही संशयितांना पकडले आहे. संजू धनंजय पाल (वय 23), राम संतोषकुमार भारिया (19) आणि ईश्‍वर मखवना (23) अशी संशयितांची नावे असून हे तिघेही गोवा सोडून विविध मार्गाने मध्य प्रदेश येथे पळून जाण्याच्या बेतात होते. 

पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी मडगावात येऊन तपासाचा आढावा घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता ही बलात्काराची घटना घडली होती. बलात्काराला बळी पडलेली युवती आपल्या मित्रासह सेर्नाभाटी समुद्र किनार्‍यावर फिरायला आली होती. या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना अडवले व त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पीडित युवतीच्या प्रियकराने त्यांना दोनशे रुपये दिले होते. ते पैसे घेऊन त्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या समोरच त्याच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी या घटनेसंदर्भात कोलवा पोलिस स्थानकात तक्रार नोंद झाली होती. संशयित इंदूर मध्यप्रदेश येथील रहिवाशी आहेत. या तिघांविरोधातही मध्यप्रदेश पोलिस स्थानकात अनेक गुन्हे नोंद आहेत.

या तिघांमधील पाल हा पेशाने शिक्षक असून राम हा विद्यार्थी आहे. यापूर्वीसुद्धा ते गोव्यात येऊन गेले होते, अशी माहिती महानिरीक्षक सिंग यांनी दिली. या तिघांनाही कोकणी भाषा बोलता येत नाही. गुरुवारी ते चोरीच्या उद्देशाने समुद्र किनार्‍यावर आले होते.

पोलिस अधीक्षक अरविंद गावस म्हणाले की, बलात्कार प्रकरणातील पहिला संशयित संजू पाल याला पोलिसांनी करमळी रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. दुसरा संशयित राम संतोषकुमार भारिया याला मडगावच्या कदंब बसस्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. तर तिसरा संशयित ईश्‍वर मखवना याला मडगाव कोकण रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक गावस यांच्या नेतृत्वाखाली खास पोलिस पथक नियुक्त करण्यात आले होते. यात दक्षिण गोव्यातील अनुभवी पोलिस अधिकारी आणि हवालदारांचा  समावेश होता.