Sun, May 26, 2019 11:33होमपेज › Goa › विधानसभा परिसरात सिक्वेरांचे स्मारक उभारणारच

विधानसभा परिसरात सिक्वेरांचे स्मारक उभारणारच

Published On: Jan 17 2018 2:12AM | Last Updated: Jan 17 2018 1:50AM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनिधी

जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांच्यामुळे आज गोव्याचे अस्तित्व टिकून आहे. त्यांचे स्मारक विधानसभा परिसरात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्हाला भांडावे, त्याग करावा लागला तरी आम्ही तयार आहोत.  डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या स्मारकासाठी  वेळप्रसंगी मंत्रीपद आणि आमदारकी सोडण्यास तयार आहे, पण  स्मारक उभारून दाखविले जाईल, असे प्रतिपादन नगरनियोजन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केले आहे.

अस्मिता दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर मडगाव लोहिया मैदानावर आयोजित केलेल्या सभेत सरदेसाई बोलत होते.  जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर, नगराध्यक्षा बबिता आंगले, ट्रोजन डिमेलो, पीडिए  अध्यक्षा रेणुका डिसिल्वा, माजी मंत्री बाबुश मोन्सेरात व सुमारे दोन हजार लोक या सभेला उपस्थित होते. मंत्री  सरदेसाई म्हणाले, की काँग्रेस आमदारांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.   अस्मिता दिवसाच्या शासकीय कार्यक्रमांची निमंत्रणे सर्व आमदारांना पोचली होती.

पण काँग्रेसचा एकही आमदार उपस्थित राहिला नाही याची खंत वाटते. डॉ. जॅक सिक्वेरा यांच्यामुळे आम्ही आमदार आणि मंत्री बनलो आहोत; अन्यथा पंचायत सदस्य राहिलो असतो. पन्नास वर्षे राज्यात सत्ता गाजवलेल्या राष्ट्रीय पक्षाला डॉ. जॅक सिक्वेरा यांची कधीच आठवण झाली नाही.  काँग्रेसच्या आमदारांना गोव्याचे नाव घ्यायला लाज वाटते म्हणून त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

काँग्रेसचे स्थानिक नेते दिल्लीत बसलेल्या पक्षश्रेष्ठींना घाबरत आहेत. हे पक्षश्रेष्ठी केवळ दलाली करण्यासाठी गोव्यात येत असल्याची टीका विजय सारदेसाई यांनी केली. मंत्री जयेश साळगावकर म्हणाले, की जनमत कौल हा गोव्यासाठी दुसरा मुक्तीदिन आहे. तो दरवर्षी साजरा झालाच पाहिजे.  त्यावेळच्या नेत्यांनी  आपली हुशारी दाखवून विलिनीकरण का नको हे लोकांसमोर मांडले. याचा  इतिहास भावी पिढीसमोर येणे गरजेचे आहे. शालेय शिक्षणात हा इतिहास समाविष्ट झाला पाहिजे.

मंत्री विनोद पालयेकर म्हणाले, की म्हादईच्या अस्तित्वासाठी सरकार विरोधात जाऊन काम करावे लागले तर तेही केले जाईल. पण शेवटपर्यंत लढा दिला जाईल. त्यामुळे कर्नाटकातील लोकांकडून शिव्या खाव्या लागल्या तरी हरकत नाही. मोहनदास लोलयेकर,  ट्रोजन डिमेलो, बबिता आंगले, माजी आमदार फेरल फुर्तादो, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांची भाषणे झाली. प्रशांत नाईक यांनी सूत्रसंचालन  केले व त्यांनीच आभार मानले.