Fri, Sep 21, 2018 22:57होमपेज › Goa › मडगावात कार्निव्हल उत्साहात

मडगावात कार्निव्हल उत्साहात

Published On: Feb 12 2018 2:10AM | Last Updated: Feb 12 2018 2:03AMमडगाव  :  प्रतिनिधी 

राज्यात शनिवारपासून किंग मोमोची राजवट सुरू झाली असून  रविवारी मडगाव, फातोर्डा येथे आयोजित कार्निव्हल मिरवणुकीने प्रेक्षकांचे मन जिंकले. ओपिनियन पोल सर्कलपासून चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.  स्थानिकांनी तसेच देशी-विदेशी पर्यटकांनी कार्निव्हलचा  आनंद लुटला.   विविध  सामाजिक संदेश देणार्‍या चित्ररथांनी  तसेच  आकर्षक देखाव्यांनी  मिरवणुकीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.  कार्निव्हल मिरवणुकीला  संध्याकाळी 5 वाजता  नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, माजी मंत्री एदुआर्द  फालेरो, माजी मंत्री  मामा कार्दोज,   मडगावच्या नगराध्यक्षा डॉ.बबिता प्रभुदेसाई  व नगरसेवकांच्या उपस्थितीत  प्रारंभ करण्यात आला.

यंदाचा कार्निव्हलमध्ये  पर्यटन खात्याबरोबरच, एफसी गोवा, किंगफिशर या  संस्थांनी  आयोजनासाठी सहकार्य दिले होते.फन जंक व कौटुंबिक विषयांवर आधारित  चित्ररथांसह  समूहनृत्याच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली. घुमट वाद्यांची निर्मिती,  गावडी परंपरा, कुणबी नृत्य, काजू फेणी व नारळाचा सुर यांची निर्मिती प्रक्रिया यांचे प्रदर्शन कलाकारांनी अप्रतिम केले होते. फातोर्डा कार्निव्हल ब्लास्ट 2018 या कार्यक्रमाचे आयोजन 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ओपिनियन पोल सर्कलजवळ करण्यात आले आहेे.

मिरवणुकीनंतर सायंकाळी 7 वाजता  आंतरराष्ट्रीय   ख्यातीच्या वाद्यवृंदांनी सादर केलेल्या संगीताने  रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध  गायिका लॉर्ना फर्नांडिस यांच्या कार्यक्रमाचाही  रसिकांनी आनंद लुटला. यावेळी वाहतूक पोलिसांनी योग्य ट्रॅफिक नियंत्रण ठेवले असून  तसेच अग्निशामक दलानेही आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती.  कार्निव्हल कार्यक्रमांतर्गत लोकांच्या मनोरंजनासाठी सोमवार दि.12 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्कायहाय बँड चा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर वेशभूषा स्पर्धाही   होणार आहे.