Fri, Apr 26, 2019 15:57होमपेज › Goa › आ. प्रतापसिंह राणेंनी माफी मागावी

आ. प्रतापसिंह राणेंनी माफी मागावी

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

विदेशात नोकरी करणारे गोमंतकीय युवक हे साफसफाईचे काम करतात, या आक्षेपार्ह विधानाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी  माफी मागावी, अशी जोरदार मागणी पणजी येथील काँग्रेस भवनात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठराव संमत केल्यानंतर  आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेस प्रवक्‍ते अमरनाथ पणजीकर यांनी केली. 
आमदार राणे यांनी माफी न मागितल्यास त्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही  त्यांनी केली.  काँग्रेस भवनात आमदार राणे यांच्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार राणे यांनी माफी मागण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. 

पणजीकर म्हणाले की, विदेशात नोकरी करणार्‍या गोमंतकीयांसंदर्भात आमदार राणे यांनी केलेले हे विधान चुकीचेच आहे. त्यांनी आपल्या या चुकीबद्दल माफी मागावी. आमदार राणे हे ज्येष्ठ राजकीय नेते असून नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी अशा प्रकारचे  केलेले विधान हे चुकीचे असल्याचे पणजीकर म्हणाले. 

उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके म्हणाले की, आमदार राणे यांनी जेव्हा विधानसभेत सदर आक्षेपार्ह विधान केले तेव्हाच सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी हरकत घेणे आवश्यक  होते. अशा प्रकारचे विधान करु नये असे त्यांना सूचित करायला हवे होते. काँग्रेस पक्ष हे सर्वसामान्य जनतेला प्राधान्य देणारा पक्ष. त्यामुळे  अशा ज्येष्ठ आमदारांकडून असे विधान करणे ही चूकच आहे. पक्षासाठी अगोदर जनता मग नेते. आमदार राणे यांच्या सदर विधानासंबंधीत   काँग्रेसच्या अन्य आमदारांनी आपले वैयक्‍तिक मत मांडावे, असेही भिके यावेळी म्हणाले.यावेळी प्रदेश काँग्रेस प्रवक्‍ते   उर्फान मुल्‍ला, संकल्प आमोणकर, सिध्दनाथ बुयांव, विठ्ठू मोरजकर, जनार्दन भंडारी व अन्य उपस्थित होते.