Thu, Jun 20, 2019 14:39होमपेज › Goa › शालेय विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करावा 

शालेय विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करावा 

Published On: Feb 05 2018 1:41AM | Last Updated: Feb 04 2018 11:58PMकाणकोण ः प्रतिनिधी

राज्यातील शालेय  विद्यार्थ्यांना संगीत विषय सक्‍तीचा करणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन काणकोण मतदार संघाचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी आज श्रीस्थळ येथे बोलताना केले. काणकोण कलाकार संघाने श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या प्रांगणात आयोजित केलेल्या 14 व्या पं. गोविंदराव अग्नी आणि पं.अंजनीबाई लोलयेकर स्मृती संगीत संमेलनाचे उदघाटन  प्रसंगी ते बोलत होते.                                

व्यासपीठावर सरपंच देवेंद्र नाईक, मडगाव रवींद्र भवनाचे अध्यक्ष प्रशांत नाईक , नगराध्यक्ष प्रार्थना नाईक गावकर, उपसरपंच विधा गायक, देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल नाईक गावकर ,संमेलनाध्यक्ष अजित पैगींणकर ,काणकोण कलाकार संघाचे अध्यक्ष सूरज कोमरपंत ,सचिव अनिल फळदेसाई उपस्थित होते.

आमदार फर्नांडिसपुढे म्हणाले की,सरकार कला व सांस्कृतिक कार्यक्रमांवर तसेच रवींद्र भवनांवर पुष्कळ निधी  खर्च करते.त्या पैशांचे चीज झाले पाहिजे,असे ते म्हणाले.काणकोण रवींद्र भवनाचे काम दीड वर्षाच्या काळात पूर्ण होणार असून त्या भवनाला कुणाचे नाव द्यायचे ते काणकोणकारांनी ठरवावे, असे आवाहनही त्यांनी   केले.  

शिक्षक तथा लोककलाकार  संदीप नाईक गावकर यांचा  आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी शाल ,श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन दिलखुश खोलकर यांनी यावेळी केले. संमेलनाध्यक्ष अजित पैगिंणकर यांनी सांगितले, की संकुचित वृत्ती बाजूला ठेवून सर्वांनाबरोबर घेऊन गेल्यास  कोणत्याही संस्थेची निश्चित प्रगती होते, काळ आपल्या साठी थांबत नाही, असे सांगून काणकोण कलाकार संघ सोडून गेलेल्यांनी  परत यावे,असे आवाहनही त्यांनी केले.

प्रशांत नाईक यांनी  सांगितले,की संमेलनात तानसेन आहेत. पण कानसेन कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे.  काणकोण कलाकार संघाने विद्यार्थ्यांना संमेलनात सामावून घेण्याची गरज आहे. यावेळी अनिल नाईक गावकर , प्रार्थना नाईक गावकर, देवेंद्र नाईक यांची यावेळी भाषणे झाली. संघाने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी यावेळी केले. स्मिता कोमरपंत यांच्या इशस्तवनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. सूरज कोमरपंत यांनी प्रास्ताविक केले. अनिल फळदेसाई यांनी अहवाल सादर केला.