होमपेज › Goa › दाबोळी विमानतळावर ‘मिग २९’ला अपघात

दाबोळी विमानतळावर ‘मिग २९’ला अपघात

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:47PM

बुकमार्क करा
दाबोळी : प्रतिनिधी

दाबोळी  नौदल विमानतळावर बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवरून घसरल्याने मिग 29  विमानाने पेट घेतला. आपत्कालीन यंत्रणेच्या आधारे विमानाबाहेर उडी मारून वैमानिकाने स्वतःचा बचाव केला. मात्र, या प्रयत्नात ते किरकोळ जखमी झाल्याने त्यांना नौदलाच्या आयएनएचएस जिवंती या इस्पितळात उपचारासाठी  दाखल करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी नौदलाचे मिग 29 हे लढाऊ विमान रोजच्या सरावासाठी उड्डाणाच्या तयारीत असताना विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने हे विमान थांबविण्याचा प्रयत्न केला असता विमान घसरुन धावपट्टीबाहेर गेले. त्याचवेळी वैमानिकाने प्रसंगावधान राखून  आपत्कालीन यंत्रणेचा वापर करून विमानातून बाहेर उडी मारली. दरम्यान, धावपट्टीबाहेर गेल्याने विमानाने लगेच पेट घेतला. 

हा अपघात हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळताच त्यांनी सर्व आपत्कालीन सेवा विभागात माहिती दिली. नौदलाचे आगीचे बंब व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आगीवर ताबडतोब नियंत्रण मिळविले.