Sat, Nov 17, 2018 06:39होमपेज › Goa › लुईझिन फालेरो पुन्हा सात राज्यांचे काँग्रेसचे प्रभारी

लुईझिन फालेरो पुन्हा सात राज्यांचे काँग्रेसचे प्रभारी

Published On: Aug 22 2018 12:55AM | Last Updated: Aug 22 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री तथा आमदार लुईझिन फालेरो यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुन्हा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्‍त केले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आसाम वगळता सात राज्यांच्या प्रभारीपदाची  जबाबदारी पुन्हा सोपविली आहे. फालेरो यांनी याआधीही 2007-08 पासून सात वर्षे ईशान्य भारतातील या सात राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर राज्यात परतल्यावर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसचे तब्बल 17 आमदार निवडून आले होते. स्थानिकांच्या     आग्रहामुळे पुन्हा ते निवडणुकीत उतरले  व नावेली मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. 

पूर्वी ईशान्य भारतातील सात राज्यांचे प्रभारी  असताना त्यांच्याशी  अखिल भारतीय काँग्रेस समितीचे 3 सचिव संलग्न होते. यावेळी त्यांच्या दिमतीला 7 सचिव असणार आहेत. अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपवली आहे. मिझोरममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून तेथे काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

फालेरो यांनी 26 नोव्हेंबर 1998 ते 8 फेब्रुवारी 1999 तसेच 9 जून 1999 ते 24 नोव्हेंबर 1999 असे दोनवेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. गोव्यात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.