Fri, Dec 13, 2019 18:26होमपेज › Goa › कायदेशीर शॅक्सनाच भरपाई 

कायदेशीर शॅक्सनाच भरपाई 

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:40AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यात ‘ओखी’ चक्रीवादळ ही ‘नैसर्गिक आपत्ती’असल्याचे सरकार मानत असून कायदेशीर शॅक्सचे नुकसान झाले असल्यास, त्यांनाच सरकार भरपाई देईल, असे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी सांगितले. पर्वरी येथील सचिवालयात राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मंत्री खंवटे, मुख्य सचिव शर्मा तसेच दोन्ही जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री खंवटे  बोलत होते.

खंवटे म्हणाले, की ओखी चक्रीवादळाचा फटका पूर्ण राज्याला बसलेला नसून किनार्‍यांवरच अधिक प्रभाव जाणवल्याचे आढळून आले आहे. राज्यातील मुख्यत: पेडणे, बार्देश, सासष्टी या तीन तालुक्यांमधील किनारी भागातील शॅक्स व्यावसायिकांना फटका बसला आहे. त्यामुळे या घटनेकडे ‘राज्य आपत्ती’ म्हणून न बघता याकडे ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून सरकार पाहत आहे. मात्र, राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदीअंतर्गत वादळामुळे आपद्ग्रस्त झालेल्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या शॅकच्या नुकसानीला सरकार जबाबदार नाही. महसूल खात्याच्या आणि पर्यटन खात्याच्या अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे.

खंवटे म्हणाले, की ओखी वादळाचा फटका ज्या शॅक व्यावसायिकांसह अन्य घटकांना बसला, त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार आहे. सीआरझेड उल्लंघन आदी गैरप्रकार जर आढळून आले, तर  तो विषय महसूल खात्यांतर्गत येत नसून  त्याबाबत सीआरझेड व पर्यटन खाते कारवाई करेल.

मंत्री खंवटे म्हणाले, की प्रत्यक्ष किती लाख रुपयांची हानी झाली आहे, ते मामलतदारांचे अहवाल मिळाल्यानंतर समजणार आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार  दोन्ही जिल्ह्यात मिळून 20 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले असावे. राज्यातील सर्वच शॅक्सना फटका बसलेला नाही. उत्तर गोव्यातील हरमल, मांद्रे, मोरजी, हणजूण, कांदोळी, केरी या भागातील हानींविषयीचे अहवाल सरकारला मिळाले आहेत. सासष्टीतीलही काही किनार्‍यांवरील  अहवाल प्राप्त झाला आहे. दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी सादर केलेल्या अहवालानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन मंडळाने स्थितीचा आढावा घेतला आहे. 

मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या घरांची अथवा मालमत्तांची हानी झाल्याची तक्रार मत्स्योद्योग खात्याकडे कुठूनही आलेली नाही. मात्र एक-दोन ठिकाणी किनार्‍यांची मोठ्या प्रमाणात धूप झाल्याची शक्यता खंवटे  यांनी व्यक्‍त केली.