Sun, Apr 21, 2019 02:43होमपेज › Goa › मालमत्तेचा दोन महिन्यांत तपशील द्या 

मालमत्तेचा दोन महिन्यांत तपशील द्या 

Published On: Aug 27 2018 1:13AM | Last Updated: Aug 27 2018 12:32AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील पंचायत, पालिका, महापालिका, जिल्हा पंचायत आदी सर्व स्वायत्त स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांनी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत आपल्या मालमत्तेची माहिती लोकायुक्‍तांना सादर करण्याचा आदेश लोकायुक्‍त कार्यालयातून देण्यात आला आहे. 

राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी 31 मार्च 2017 पर्यंतचा मालमत्ता अहवाल 30 जूनपर्यंत लोकायुक्‍तांना सादर करायचा असतो. पण अनेक पंचायत व पालिका सदस्यांनी आपल्या मालमत्तेचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे लोकायुक्‍त निवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांनी 2 ऑगस्ट रोजी मुख्य सचिवांना याविषयीचा अहवाल पाठविला होता.

मालमत्तेची माहिती निर्धारित मुदतीत सादर न केलेल्या पंचायत सदस्यांना मालमत्तेची माहिती सादर करण्याचे निर्देश लोकायुक्त निबंधकांनी याविषयी सर्व पंचायतींना नोटिसा पाठविल्या आहेत.लोकायुक्‍त निबंधकांनी आपल्या पत्रासह संबंधितांना सोपे जावे, यासाठी मालमत्तेची माहिती सादर करण्यासाठीचा एक विहित तक्ताही पाठविला आहे. त्या तक्त्यात दिल्याप्रमाणे आवश्यक ती माहिती भरणे सक्तीचे आहे. 

लोकायुक्त कायद्यानुसार प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या मालमत्तेचा तपशील 30 जूनपर्यंत सादर करणे गरजेचे असते. या निर्धारित वेळेत माहिती सादर न करणार्‍यांना दुसरी संधी दिली जाते, पण असे असतानाही माहिती सादर न करणार्‍यांची नावे नंतर जाहीर केली जातात. गेली अनेक वर्षे राज्यातील पंचायत सदस्य अशी माहिती देत नव्हते. पण गेल्यावर्षीपासून लोकायुक्तांनी सर्वांनाच पत्र पाठवून माहिती सादर करण्याची सूचना केली. त्यानंतर काहीजणांनी माहिती सादर केली होती. ज्यांनी माहिती सादर केलेली नाही, त्यांना येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत ही माहिती सादर करता येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.