Wed, Apr 24, 2019 21:32होमपेज › Goa › ‘गोमेकॉ’त लवकरच यकृत प्रत्यारोपण सुविधा

‘गोमेकॉ’त लवकरच यकृत प्रत्यारोपण सुविधा

Published On: Apr 08 2018 2:11AM | Last Updated: Apr 08 2018 2:11AMपणजी : प्रतिनिधी

यकृत प्रत्यारोपणाची सुविधा लवकरच बांबोळी येथील ‘गोमेकॉ’त सुरू केली जाणार आहे. येथे पूर्णवेळ कर्करोग विभाग सुरू होईपर्यंत येथील रुग्णांवर बेळगाव येथील केईएल इस्पितळात उपचाराची सोय करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी  सांगितले. 

बांबोळी येथे आयोजित जागतिक आरोग्य दिनाच्या  कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले की, ‘गोमेकॉ’ इस्पितळात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आहेत. या आरोग्य सुविधांचा  चांगला वापर होणे आवश्यक आहे.  ‘गोमेकॉ’त अवयव प्रत्यारोपण समिती स्थापनेविषयी व अन्य काही गोष्टींबाबत ‘गोमेकॉ’च्या डीन सोबत चर्चा करण्यात आली आहे. ‘गोमेकॉ’त अवयव प्रत्यारोपण सुविधेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद  करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. मणिपाल इस्पितळाकडून  प्रथमच अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरीडोअर तयार करण्यात आला.     

अशा प्रकारची सुविधा ‘गोमेकॉ’तही सुरु केली जाईल. किडनी प्रत्यारोपणाची सोय ‘गोमेकॉ’त सुरु करण्यात येईल, असे यापूर्वी सांगण्यात आले होते. त्यानुसार ती कार्यरत करण्यात आली आहे. यकृत प्रत्यारोपणाचीही सुविधा लवकरच  सुरु केली जाईल. कार्यक्रमास डॉ. प्रदीप नाईक, आरोग्य संचालक डॉ. संजीत दळवी, दंतचिकित्सा महाविद्यालयाचे डीन डॉ. आयडा  दे अताईद, डॉ. राजनंदा देसाई, डॉ.जोस डिसा  व अन्य मान्यवर उपस्थित होते.