Sun, Mar 24, 2019 12:59होमपेज › Goa › देशात सामान्यांचे जगणे कठीण

देशात सामान्यांचे जगणे कठीण

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 12:59AMपणजी : प्रतिनिधी

देशात  अराजकता माजली असून एससी, एसटी समाजाच्या लोकांवर अत्याचार वाढले आहेत. सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी सांगितले.
राष्ट्रीय काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून प्रदेश काँग्रेसतर्फे येथील आझाद मैदानावर आयोजित  लाक्षणिक उपोषणावेळी  ते बोलत होते. 

अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे देशात जातीय सलोखा   प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने आयोजित  देशव्यापी   उपोषणाचा भाग म्हणून  सकाळी 11 ते  संध्याकाळी  5 वाजेपर्यंत पणजीत आंदोलन करण्यात आले.अ‍ॅड. नाईक म्हणाले की, केंद्र सरकारला सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास अपयश आले आहे. देशात अराजकता वाढली आहे. भाजपचे मंत्री आक्षेपार्ह  विधाने करतात, परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.   गोव्यातदेखील भाजप सरकारकडून  याचप्रकारे सरकार चालवले जात आहे.  दीनदयाळ उपाध्याय यांचे छायाचित्र विविध सरकारी खात्यांच्या अर्जांवर  छापण्यात आले आहे. उपाध्याय हे लोकशाही  मानत  नव्हते. मात्र, तरीदेखील  त्यांचे छायाचित्र छापण्यात आले असल्याची टीका त्यांनी केली.

विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर म्हणाले की, भाजप  लोकांना मान्य नसलेली धोरणे जनतेवर लादत आहे. एससी, एसटी समाजावर अत्याचार वाढले  आहेत. दलित संघटनांनी देशभरात पुकारलेल्या बंदच्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न  निर्माण  होऊन  9 जणांना आपला  जीव गमवावा लागला. केंद्र सरकार सांगते  एक व करते भलतेच. त्यांच्याकडून केवळ धनदांडग्यांना तसेच उच्चभ्रूंना  पुढे आणले  जात आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणार्‍यांचा आवाज दाबला जात आहे.  देशभरात शांती व सलोखा प्रस्थापित व्हावा, असा संदेश देण्यासाठी या उपोषणाचे आयोजन  काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांच्या आदेशानुसार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो, फिलीप नेरी रॉड्रिग्स, जेनिफर मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा, क्‍लाफासिओ डायस, इजिदोर फर्नांडिस, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी खासदार   फ्रान्सिस  सार्दिन, माजी उपसभापती  शंभू भाऊ बांदेकर,  सावित्री कवळेकर, मनपा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो आदी काँग्रेस नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Tags :Life of common people,  in country ,is danger, ad.naik goa news