Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Goa › तीन लाख खाण अवलंबितांचा प्रश्‍न सोडवा प्रदेश काँग्रेसचे पंतप्रधानांना पत्र

तीन लाख खाण अवलंबितांचा प्रश्‍न सोडवा प्रदेश काँग्रेसचे पंतप्रधानांना पत्र

Published On: Jun 01 2018 1:58AM | Last Updated: Jun 01 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

खाणबंदीबाबत राज्य सरकारकडून तातडीने उपाययोजना केली जात नसल्याचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. पावसाळ्यानंतर जर खाणी सुरू झाल्या नाहीत तर राज्याचे आर्थिक गणित कोलमडून पडेल. खाण व्यवसायावर अवलंबून असलेले सुमारे 3 लाख लोक हवालदिल झाले असून त्यांचा प्रश्‍न सोडवावा. राज्य सरकारकडून केवळ पोकळ आश्‍वासने दिली जात आहेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गोवा राज्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अभावी भाजप आघाडी सरकार राज्याचे प्रशासन चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील खाणी तातडीने सुरू होणे ही आत्यंतिक गरज असून राज्य सरकारच्या अनास्थेमुळे खाण व्यवसायावर तसेच अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. राज्याच्या जनतेत मोठ्या प्रमाणावर असंतोष माजला असल्याचेही पत्रात म्हटले आहे.  

राज्य सरकारनेच याआधी, 2012 साली सर्व खाणी बंद केल्या होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदीवर शिक्कामोर्तब केले होते. राज्याचे भाजप आघाडी सरकार  लोकांना खोटी आश्‍वासने देत सुटले असून या समस्येवर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. केंद्रात आणि राज्यातही भाजपचेच सरकार असूनही मागील सात सात वर्षांपासून खाणबंदीवर तोडगा काढला जात नाही. राज्यातील अनेक खाण कंपन्यांनी कामागारांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केल्यामुळे राज्यभरातील खाण अवलंबितांनी  आंदोलने केली असल्याचे चोडणकर यांनी पत्रात नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी- 2018 रोजी खाणबंदीबाबतचा निकाल दिला असला तरी त्यावर यशस्वी तोडगा काढून खाणी पुन्हा मार्गावर आणण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.   काँग्रेस पक्ष नेहमीच खाण अवलंबितांच्या मागे राहिला असून  घटनात्मक अथवा न्यायालयीन मार्गाने कोणताही कायदेशीर तोडगा काढण्यात आल्यास पक्ष पाठिंबा देणार असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.