Sat, Jul 20, 2019 15:47होमपेज › Goa › बलात्कार्‍यांना गोव्यातच फाशी द्या  

बलात्कार्‍यांना गोव्यातच फाशी द्या  

Published On: May 28 2018 1:44AM | Last Updated: May 27 2018 11:52PMमडगाव : प्रतिनिधी

सेर्नाभाटी सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केलेल्या संशयितांना गोव्यातच मृत्युदंडाची अर्थात फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी घेऊन  महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच गोंयचो आवाज संघटना आणि बेतालभाटी  येथील जागरूक नागरिकांनी रविवारी मडगाव पोलिस स्थानकावर मोर्चा नेला.  महिला काँग्रेस कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये यावेळी वादावादी होण्याचा प्रकार  दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर घडला. ‘त्या’ नराधमांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करून प्रदेश महिला काँग्रेसच्या सदस्यांनी मडगाव पोलिस स्थानकासमोर यावेळी धरणे धरले.

सेर्नाभाटी येथे एका स्थानिक  युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली मडगाव पोलिस स्थानकावर मोर्चा काढण्यात आला होता.आम्हाला पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांना भेटायचे आहे, अशी मागणी काँगेसच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी त्यांना पोलिस स्थानकात प्रवेश करण्यापासून रोखून अधीक्षक गावस  रजेवर असल्याचे सांगितले. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून दक्षिण गोव्यात महिलांवर सामूहिक बलात्कार होत असताना पोलिस अधीक्षक गावस आणि उपअधीक्षक राजू राऊत देसाई कार्यालयात अनुपस्थित असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. त्या नराधमांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी  महिला काँग्रेसच्या सदस्यांनी लावून धरली. पोलिस स्थानकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यास आक्षेप घेऊन पोलिस निरीक्षक  नायक यांनी काही वेळात उपअधीक्षक येणार असल्याचे सांगून पोलिस स्थानकात प्रवेश करू नये, अशी सूचना केली.

महिला काँग्रेसकडून त्या संशयितांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करण्यात आली होती.पण ती धुडकावून  कायद्याने ते शक्य नसल्याचे पोलिस निरीक्षक नायक यांनी आंदोलकांना सांगितले. पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक आणि पर्यटन मंत्र्यांना सामूहिक बलात्कार प्रकरणाचे काहीच गांभीर्य नाही, त्यामुळे ते हजर नसल्याचे कुतिन्हो म्हणाल्या.सामूहिक बलात्काराचे प्रकार कधीच गोव्यात घडले नव्हते. या प्रकारामुळे त्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्या  संशयित नराधमांना महिला काँग्रेसच्या ताब्यात द्या, आम्ही काय तो न्याय करू, असे सांगून काँग्रेसच्या सदस्यांनी पोलिस स्थानकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक नायक यांनी मुख्यालयाचे मुख्य  प्रवेशद्वार कुलूप लावून बंद केले.दुसर्‍या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा  तैनात करून गेट बंद करण्यात आले.

प्रकरण हाताबाहेर जात असल्याने शेवटी पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांना पाचारण करण्यात आले.राजू राऊत देसाई यांची भेट घेऊन प्रतिमा कुतिन्हो यांनी न्याय मिळत नसल्याचा आरोप केला. काणकोण येथे सहा वर्षाच्या बलिकेवर बलात्कार झाला होता,   अद्याप त्या प्रकरणाचाही तपास झालेला नाही, असे सांगितले. राजू राऊत देसाई यांनीस्पष्टीकरण देताना  सांगितले की, आपण सासष्टीचे पोलिस उपअधीक्षक असून सासष्टीतील प्रकरणांविषयीच आपण स्पष्टीकरण देऊ शकतो. बलात्काराचा प्रकार कुठे घडला आहे, याची माहिती तुम्हाला नाही. कोलवा, बाणावली, माजोर्डा येथे दोन उपनिरीक्षक आणि वीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. बलात्काराचा प्रकार समुद्र किनार्‍यावर घडल्याचे राऊत देसाई म्हणाले. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, सामूहिक बलात्काराचे प्रकार बिहार, ओडिशासारख्या राज्यांत होतात.गोव्यात असा प्रकार पहिल्यांदाच   घडला. या संशयितांना मृत्यूदंडाची शिक्षा गोव्यात मिळावी यासाठी पोलिसांनी  प्रयत्न करावेत.

महिला काँग्रेस पदाधिकार्‍यांशी वादावादी

प्रतिमा कुतिन्हो यांनी पोलिस स्थानकात प्रवेशास  विरोध करणारे पोलिस बलात्कार्‍यांना संरक्षण पुरवत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी दांडे लावून वाट बंद केली होती.  पोलिस स्थानकात प्रवेश करण्यावरून पोलिस आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये वादावादी  होऊन पोलिसांकडून कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही झाली.