Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Goa › 'खाणी सुरू करण्यासाठी खास कायदा करू'

'खाणी सुरू करण्यासाठी खास कायदा करू'

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:50AMचोडण ः प्रतिनिधी

राज्यातील खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी सरकार चोहोबाजूंनी प्रयत्न करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून खाणी सुरू करण्यासाठी अनुकूल निर्णय मिळण्यास दिरंगाई झाल्यास विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून खास कायदा संमत करू अथवा केंद्र सरकारकडून खास वटहुकूम काढून  खाणी सुरू करू, असे प्रतिपादन नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी मये येथे केले. खाण अवलंबितांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही सरदेसाई  यांनी यावेळी सांगितले.

केळबायवाडा येथे एका कार्यक्रमास मंत्री सरदेसाई उपस्थित राहिले असता, मयेतील चौगुले खाण कंपनीचे कामगार व डिचोलीतील सेझा गोवा कंपनीच्या कामगारांनी त्यांची भेट घेतली. खाण अवलंबितांवर कोसळलेल्या संकटाची माहिती खाण कामगारांनी यावेळी मंत्री सरदेसाई यांना दिली. त्यावर सरदेसाई म्हणाले की, खाणी बंद झाल्या म्हणून कामगारांना घरी पाठवण्याचे खाण मालकांचे धोरण चुकीचे आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या खाण अवलंबितांच्या बाजूने सरकार ठामपणे उभे आहे, याचे भान खाण मालकांनी ठेवावे. खाणी सुरू होणारच पण तोपर्यंत कामगारांना खाण कंपन्यांनी वार्‍यावर सोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पर्यावरणाच्या नावाने सर्वच व्यवसाय बंद केले तर गोवेकरांनी जगावे कसे, याचाही विचार पर्यावरणप्रेमींनी आणि न्यायालयांनीही करावा. गोव्याची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असेही सरदेसाई म्हणाले. 

संतोषकुमार सावंत यांनी कामगारांची मंत्री विजय सरदेसाई यांच्याशी भेट घडवली.

Tags : goa, vijay sardesai, BJP, mine