Mon, May 20, 2019 18:38होमपेज › Goa › माळोली-सत्तरीत जखमी बिबट्याला जीवदान

माळोली-सत्तरीत जखमी बिबट्याला जीवदान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वाळपई : प्रतिनिधी

साळींदर व बिबट्या यांच्यात झालेल्या संघर्षात बिबट्या जबर जखमी होण्याचा प्रकार घडला असून त्याला प्राणिमित्र प्रदीप गंवडळकर यांनी जीवदान देण्याची घटना रविवारी दुपारी  माळोली सत्तरी येथे घडली.  हा बिबट्या जखमी अवस्थेत माळोली येथील पुलाखाली पाणी पिण्यासाठी आला होता, तेथेच तो जखमी अवस्थेत पडला होता.

याबाबतची माहिती अशी की, रविवारी दुपारी नगरगाव-माळोली  रस्त्यावरील पुलाखाली बिबट्या जखमी स्थितीत पडला असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. त्यांनी याबाबतची माहिती  तातडीने प्राणिमित्र संघटनेचे वाळपईतील कार्यकर्ते प्रदीप गंवडळकर यांना दिली. गंवडळकर यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन  बिबट्याला सुखरूप  स्थितीत ताब्यात घेतले व बोंडला प्राणिसंग्रहालयाच्या पथकाकडे सोपवले. 

याबाबत गंवडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या बर्‍याच प्रमाणात जखमी झाला होता व त्याच्या सर्वांगाला  साळींदराचे  काटे टोचले  होते. यामुळे तो गंभीर जखमी झाला होता व पाणी पिण्यासाठी तो गावातील पाणवठ्यावर आला होता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सदर बिबट्याचा वावर या भागात गेल्या काही महिन्यांपासून आहे. अनेकदा याबाबतची तक्रार करूनही वनखात्याची यंत्रणा निष्काळजीपणाकरत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.  

महत्त्वाचे म्हणजे  अनेक वेळा मुख्य मार्गावरून जाताना लोकांना या बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच त्याने गावातील कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात शिकारही केली आहे. यामुळे या बिबट्यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये भीती पसरली होती. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. बिबट्या आपोआपच जखमी अवस्थेत वनखात्याच्या जाळ्यात सापडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्‍त केले असून त्याला जीवदान देणारे प्राणिमित्र प्रदीप गंवडळकर यांचे अभिनंदन केले आहे. बिबट्या सध्या बोंडला प्राणिसंग्रहालयात  उपचार घेत असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वन खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.

 

Tags ; goa, goa news, Leopard, Leopard injured, 


  •