Thu, Jun 20, 2019 06:38होमपेज › Goa › खाण आंदोलकांवर लाठीमार : ११ जणांना अटक

खाण आंदोलकांवर लाठीमार : ११ जणांना अटक

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMपणजी : प्रतिनिधी

खाण बंदीवर तोडगा काढावा या मागणीसाठी  सोमवारी पणजीत  धडकलेल्या खाण आंदोलकांनी  दगडफेक केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी लाठीमार केला. काही आंदोलक जखमी झाल्याचे सांगण्यात आले असून आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आलेले कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनाही किरकोळ मार लागला. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात पाच पोलिस जखमी झाले. आंदोलकांच्या दगडफेकीत पाच वाहनांचे नुकसान झाले असून पोलिसांनी या प्रकरणी 11 जणांना अटक केली आहे. 

पणजी बसस्थानक भागात आंदोलकांच्या जमावामुळे पर्वरी-पणजी-बांबोळी  मार्गावर वाहतुकीचा चार तास खोळंबा झाला.

आंदोलकांनी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास दगडफेक करण्यास सुरवात केली. या दगडफेकीत कर्नाटक परिवहनच्या दोन बसेस, गोवा पोलिसांचे एक वाहन, अग्‍नीशमन दलाचे वाहन, तिसवाडी मामलतदारांच्या वाहनांसह, कदंब बसेस तसेच काही खासगी वाहनांचे नुकसान झाले. दगडफेकीला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अखेर लाठीमार  करण्यास  सुरवात केली. पोलिसांनी या आंदोलकांना अक्षरशः शोधून त्यांच्यावर लाठीमार केला. यावेळी झालेल्या गोंधळात पाच पोलिस जखमी झाले. जखमी पोलिसांमध्ये  तीन पोलिस कॉन्स्टेबल व दोन महिला कॉन्स्टेबलचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी  गोमेकॉत दाखल करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाने   राज्यातील 88 खाण लिजांचे परवाने रद्द केल्याने  15 मार्चच्या संध्याकाळपासून सर्व खाण व्यवहार ठप्प झाले आहेत.  खाणबंदीवर राज्य सरकारने तातडीने  तोडगा काढून खाण अवलंबितांना दिलासा द्यावा या मागणीसाठी  पणजीत सकाळी 9.30 वाजल्यापासून   शेकडोंच्या संख्येने राज्याच्या विविध भागातून खाण अवलंबित  कंदब  बसस्थानकाजवळील  क्रांती सर्कलकडे जमू लागले. मोठ्या प्रमाणात आंदोलक जमल्यानेे पणजी कदंब बसस्थानक परिसरातील वाहतूक ठप्प झाली. म्हापसा-पणजी मार्गावर पर्वरीपासून आणि पणजी-मडगाव मार्गावर बांबोळीपासून वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर,  नगरनियोजन मंत्री विजय सरदेेसाई, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, उपसभापती मायकल लोबो   यांनी  आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते फोल ठरले. मंत्री ढवळीकर यांच्यावरदेखील यावेळी   आंदोलकांनी बाटल्या  फेकून मारल्या.

दरम्यान, खाण अवलंबितांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन  मांडवीवरील दोन पूल तसेच बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून  जमावबंदी लागू करण्यात आली होती. याशिवाय मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात  गोवा पोलिसांसह महाराष्ट्र पोलिसांच्या तीन तुकड्या, सीआयएसएफच्या तीन तुकड्यांसह गोवा पोलिस राखीव दलाच्या पोलिसांचाही समावेश होता.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक चंदन चौधरी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी  क्राती सर्कलमध्ये जमलेल्या आंदोलकांना आझाद मैदानावर जाण्यास सांगितले. मात्र, आंदोलकांनी या अधिकार्‍यांचे म्हणणे न ऐकता बसस्थानकाहून पणजी शहरात, मेरशी तसेच  पर्वरीच्या दिशेने जाणारी व येणारी वाहतूक अडवून धरली.