Sun, Aug 25, 2019 03:54होमपेज › Goa › धान्यासाठी पैसे न दिल्याने मजुराचा खून

धान्यासाठी पैसे न दिल्याने मजुराचा खून

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMमडगाव : प्रतिनिधी

वार्का येथे एका बांधकामाच्या ठिकाणी  धान्यासाठीचे पैसे न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोघा मजुरांमध्ये झालेल्या भांडणात इग्‍नियश निंज (वय 40, झारखंड) याने थाडेयस बार्क (36, झारखंड) याचा दंडुक्याने मारहाण करून खून केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. कोलवा पोलिसांनी निंज याला अटक केली आहे.

कोलवा  पोलिस निरीक्षक फिलॉमेन कॉता यांनी दिलेल्या माहितीनुसार इग्‍नियश आणि थाडेयस हे दोघेही पेशाने मजूर आहेत. दोघेही एका वर्षापूर्वी कामाच्या निमित्ताने गोव्यात आले होते. वार्का येथील एका इमारतीच्या बांधकामावर ते काम करत होते. त्यांच्या राहण्याची सोय तिथेच करण्यात आलेली आहे. प्रत्येक रविवारी सर्व मजूर आठवड्याचा बाजार करत. दोघेही पैसे काढून रविवारी आठवड्याचा बाजार करणार होते.  

अशाच प्रकारे बाजार आणण्याच्या कारणावरून 8 जुलै रोजी दोघांमध्ये वाद झाला. थाडेयस याने पैसे दिलेच नाहीत, अशा क्षुल्लक कारणावरून इग्‍नियश याने वाद उकरण्यात सुरू केले. वाद विकोपाला गेला असता इग्‍नियशने जवळच असलेल्या लाकडी दंडुक्याने थाडेयसच्या डोक्यावर आणि तोंडावर वार केला. मारहाणीत जबर जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिसियो  इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बांधकाम कंत्राटदार ज्योकी गोंसाल्विस यांनी सोमवारी सकाळी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी 

संशयिताला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.  कोलवा पोलिसांनी एकूण सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यात संशयित इग्नियशही उपस्थित होता.सुरुवातीला त्याने आपण त्याला मारलेच नाही, अशी भूमिका घेतली होती. पण इतर कामगारांनी  चौकशीत  रविवारी झालेल्या मारहाणीबद्धल पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी खाकीचा  हिसका दाखवताच इग्नियशने   गुन्हा कबूल केला. दरम्यान मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समजणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक फिलॉमेन यांनी दिलेल्या माहितीनुसार  घटनास्थळावरून मारहाणीसाठी वापरलेला दंडुका जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.